रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला आहे. सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावरून याबाबतची घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने ५ वेळा आयपीएल चषक उंचावला होता. मध्यंतरी हार्दिक पांड्याला ट्रेड करून त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते; मात्र त्यानंतरही मुंबईच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे फ्रँचायझीने पुन्हा एकदा रोहितकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला असून, आज याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली.
रोहित आणि मुंबई इंडियन्सचा प्रवास नेहमीच खास राहिला आहे. २०११ मध्ये संघात सामील झाल्यापासून त्याने संघाच्या अनेक ऐतिहासिक क्षणांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच आयपीएल विजेतीपदे जिंकली आहेत. रोहित शर्माचे नेतृत्व तरुण खेळाडूंवरील विश्वास आणि 'पलटण'शी असलेले घट्ट नाते यामुळे तो मुंबई इंडियन्सचा अविभाज्य भाग बनला आहे.
कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, “मुंबई इंडियन्स हा माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग राहिला आहे आणि या संघाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी नेहमीच अभिमानाची गोष्ट राहिली आहे. आगामी हंगामाबद्दल नीता वहिनी आणि आकाश यांच्याशी झालेली चर्चा खूप उत्साहवर्धक होती आणि आम्ही काय साध्य करू शकतो, याबद्दल मला खूप विश्वास आहे.”
२० व्या हंगामासाठी, पुढील आव्हानांसाठी आणि आपल्या पलटणला साजरे करण्याचे अनेक क्षण देण्यासाठी सज्ज आहे. आमच्या शैलीतील क्रिकेट खेळणे, एकत्र स्पर्धा करणे आणि खेळाचा आनंद घेणे, यावर आमचा भर असेल, असेही रोहित म्हणाला.
हार्दिक पांड्या पंजाबच्या ताफ्यात गेल्यानंतर मुंबईचा कर्णधार कोण असेल? याची चर्चा सुरू झाली होती. हार्दिकने २०२४ ते २०२६ या दरम्यानच्या ३ हंगामात मुंबईचं नेतृत्व केलं. पण त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. २०२७ च्या हंगामाआधी हार्दिक पंजाबमध्ये गेल्याने मुंबईकडून कर्णधारपदासाठी शोध सुरु होता. रोहित व्यतिरिक्त सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांच्या नावाची कर्णधारपदासाठी चर्चा होती. मात्र रोहितने बाजी मारली.
मुंबईच्या रिटेन खेळाडूंची यादी
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, नमन धीर, अर्शदीप सिंह (ट्रेडद्वारे समावेश), कॉर्बिन बॉश, मिचेल सँटनर, शेरफेन रुदरफोर्ड, विल जॅक्स, रायन रिकेल्टन, क्वींटन डी कॉक, शार्दूल ठाकुर, अश्वनी कुमार, राज अंगद बावा आणि रघु शर्मा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.