जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात जवळपास २६ निष्पाप पर्यटकांनी जीव गमावला. गोळीबार सुरू असताना, जीव वाचवण्यासाठी सगळेच सैरावैरा पळत होते. त्याचवेळी पर्यटकांना घोड्यावरून सफर घडवून आणणारा एक तरूण हिंमतीनं पुढं आला. निर्दयीपणे पर्यटकांवर गोळ्या झाडणाऱ्या एका दहशतवाद्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याबरोबर लढला. दहशतवाद्याच्या हातून रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या या तरुणानं स्वतःचाच जीव गमावला.
सय्यद आदिल हुसैन शाह असं या धाडसी तरुणाचं नाव होतं. पहलगाममध्ये आलेल्या पर्यटकांना तो घोड्यावरून सफर घडवून आणत होता. घरातील एकुलता एक कमावता. या व्यावसायातून मिळालेल्या पैशांतून घरखर्च भागवणारा सईद आज या जगात नाहीये. पर्यटकांना वाचवण्यासाठी तो धाडसानं पुढे गेला. एका दहशतवाद्याच्या हातातील रायफल हिसकावण्याचा त्यानं प्रयत्न केला. त्यावर चीडलेल्या दहशतवाद्यानं त्याच्यावरच गोळीबार केला. यात सय्यद आदिल हुसैन शाह हा मरण पावला.
पहलगाममध्ये आलेल्या पर्यटकांवर दहशतवादी अंदाधुंद गोळीबार करत होते. काही दहशतवादी तर, गोळीबार करण्यासाठी तू मुस्लिम आहेस का, अशी विचारणा करत होते. त्यावर नाही म्हणणाऱ्यांवर ते थेट गोळ्या झाडत होते, असं एका पर्यटक महिलेनं सांगितलं. या हल्ल्यात तिचाही पती मारला गेलाय. आतापर्यंत २६ जणांचा यात मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांमध्ये शाह हा एकमेव स्थानिक आहे.
शाह हा घरातील एकमेव कमावता होता. त्याच्यावर त्याचं अख्खं कुटुंब अवलंबून होतं. घरात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि मूल असं त्याचं कुटुंब होतं. पोटच्या पोराला गमावल्यामुळं आईवर तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या कुटुंबाचं यापुढं कसं होईल अशी चिंता तिला सतावतेय. आपल्याला न्याय मिळावा, असं ती सांगतेय. हे सांगताना तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते.
सय्यद आदिल हुसैन शाहचे वडील सय्यद हैदर शाह यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, माझा मुलगा कुटुंबातील एकमेव कमावता होता. तो रोजच्या प्रमाणे पहलगामला गेला होता. दुपारी तीन वाजताच्या सुमारास दहशतवादी हल्ल्याबाबत माहिती मिळाली. आम्ही त्याला फोन केला. पण त्याचा फोन बंद होता. साडेचार वाजता त्याचा फोन वाजू लागला. पण कुणीही प्रतिसाद दिला नाही. आम्ही पोलीस ठाण्यात पोहोचलो. तेव्हा तो जखमी झाल्याची माहिती मिळाली. माझा मुलगा शहीद झालाय. तो आमच्या कुटुंबाचा आधार होता. आम्हाला न्याय हवा आहे. तो निष्पाप होता. त्याला का मारलं? जे याला जबाबदार आहेत, ते परिणाम भोगतील, असं सय्यद हैदर शाह म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.