कर्नाटकमध्ये एका डॉक्टरचं अपहरण केलं आणि त्यांच्या भावाकडून ६ कोटी रुपयांची मागणी केली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली. डॉक्टरचं अपहरण झाल्यानं पोलीस यंत्रणा कामाला लागली. पण अवघ्या १४ तासानंतर अपहरणकर्त्यांनी डॉक्टरला सोडून दिलं तेही मात्र ३०० रुपयात. या सर्व प्रकारामुळे अनेकजण बुचकळ्यात पडलेत. नेमकं काय घडलं, का अपहरण केलं हे जाणून घेऊ.
डॉक्टर अपहरण झाल्याची घटना कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यात घडली. शनिवारी सकाळी ६ वाजता ४५ वर्षीय डॉ. सुनील सूर्यनारायणपेट येथील शनैश्वर मंदिराजवळ मॉर्निंग वॉक करत होते. त्यावेळी टाटा इंडिगोमधून काहीजण आले. त्यांनी डॉक्टरांना जबरदस्तीने गाडीत बसवले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांची कार भरधाव वेगाने पळवून नेली. अपहरणाची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.
दरम्यान सुनील सूर्यनारायणपेट हे बेल्लारी जिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान डॉक्टरचं अपहरण केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी डॉक्टरचा भाऊ वेणुगोपाल गुप्ता याला व्हॉट्सॲपवर कॉल केला. त्या कॉलवर त्यांनी डॉक्टरला सोडण्याच्या मोबदल्यात ६ कोटी रुपयांची मागणी केली. सहा कोटी रुपयांपैकी अर्धी रक्कम रोख आणि अर्धी रक्कमेचे सोने हवेत, मागणी अपहरणकर्त्यांनी डॉक्टरच्या भावाकडे केली.
डॉक्टरांचे भाऊ वेणुगोपाल गुप्ता हे जिल्हा दारू विक्रेते संघटनेचे अध्यक्ष आहेत. डॉक्टरांचे अपहरण आणि खंडणीची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी शोधमोहीम तीव्र करत सर्वकडे नाकाबंदी केली. यानंतर अपहरणकर्त्यांनी रात्री उशिरा डॉक्टरला निर्जनस्थळी सोडले आणि बसने घरी जाण्यासाठी ३०० रुपयेही दिले.
या प्रकरणाबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, डॉ.सुनील हे धक्क्यात आहेत. अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. पोलीस डॉक्टरांकडून चोरट्यांची माहिती गोळा करत आहेत. डॉक्टरचा भाऊ दारूचा व्यवसाय करतो, त्यामुळे या अपहरणामागे व्यावसायिक वैमनस्य आहे का, या अँगलने तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.