बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजपच्या खासदार कंगना रणौत (MP Kangana Ranaut) पुन्हा चर्चेत आल्या आहेत. कंगना रणौत खासदार होण्यापूर्वी वादग्रस्त वक्तव्य, सोशल मीडिया पोस्ट आणि स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या. खासदार झाल्यानंतर देखील त्या स्पष्टपणे आपले मत मांडताना दिसतात. अशामध्ये कंगना रणौत यांनी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'राहुल गांधी ड्रग्जचे सेवन करतात. त्यांची टेस्ट केली पाहिजे.', असा अजब दावा कंगना रणौत यांनी केला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
राहुल गांधी यांच्या चक्रव्यूहवाल्या वक्तव्यामुळे आता राजकारण चांगलेच तापले आहे. या वक्तव्यावरूनच राहुल गांधी यांच्यावर कंगना रणौत यांनी जोरदार निशाणा साधला. कंगना रणौत यांनी राहुल गांधी यांच्या ड्रग्ज टेस्टची मागणी केली. राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कंगना राणौत यांनी सांगितले की, 'राहुल गांधी संसदेत ज्याप्रकारे बोलतात त्यावरून त्यांची ड्रग टेस्ट व्हायला पाहिजे. त्यांच्याकडे पाहून ते नेहमीच नशेमध्ये असतात असे वाटते. राहुल गांधी नेहमीच संविधानाला हानी पोहोचवतात. ते लोकसभेत फालतू बडबड करतात.' कंगना रणौत यांचे राहुल गांधी यांच्यासंदर्भातील वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कंगना रणौत यांनी सांगितले की, 'देशात लोकशाही आहे. यामध्ये पंतप्रधानांची निवड लोकशाही पद्धतीने केली जाते. राहुल दररोज असे बोलून संविधानाला हानी पोहचवत आहे. आता पंतप्रधानांची निवड वय आणि लिंगाच्या आधारे होणार का? उद्या राहुल गांधी म्हणतील की त्वचेच्या रंगाच्या आधारे पंतप्रधानांची निवड केली जाईल. त्यांना लोकशाहीचा आदर नाही का?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कंगना रणौत यांनी राहुल गांधीवर टीका करताना पुढे असे सांगितले की, 'काल संसदेतही एक कॉमेडी शो झाला होता. राहुल गांधींमध्ये प्रतिष्ठा नाही. काल संसदेत पोहोचल्यानंतर ज्या अवस्थेत ते असभ्य बोलतात ते पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांच्या वक्तव्यावरून आता मला असे वाटते की त्यांची ड्रग्ज टेस्ट झालीच पाहिजे. एक तर दारुच्या नशेत होते किंवा ड्रग्जच्या नशेत होते.'
संसदेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी महाभारताचा उल्लेख केला होता. राहुल गांधी म्हणाले होते, हजारो वर्षांपूर्वी चक्रव्यूहात अडकून अभिमन्यूचा मृत्यू झाला होता. असाच चक्रव्यूह आता तयार करण्यात आला आहे. यामध्ये शेतकरी आणि तरुणांना अडकवले जात आहे. मी थोडे संशोधन केले आणि मला कळाले की या चक्रव्यूहाचे दुसरे नाव पद्मव्यूह आहे. ज्याचा अर्थ आहे कमळाचे फूल. चक्रव्यूहाचा आकार कमळाच्या फुलासारखा आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.