LPG Rules Update : वर्षभरात तुम्ही किती गॅस सिलिंडर खरेदी करू शकता? वाचा नियम काय सांगतो
LPG Hoarding Rules Update news : आखाती देशांतील युद्धामुळे भारतातील इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मुंबई, पुण्यासह नाशिक आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा हॉटेल आणि इतर व्यवसायांवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. गॅस एजन्सीबाहेर सिलिंडरसाठी रांगा लागल्या आहेत, तर अनेक ठिकाणी बुकिंग केल्यानंतरही सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. सरकारने आता गॅस बुकिंगसाठी २५ दिवसांच्या कालावधीची मर्यादा लागू केली आहे. त्यामुळे, 'एका वर्षात एक व्यक्ती किती गॅस सिलिंडर खरेदी करू शकते?' असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत सरकारने काही नियम आणि अटी निश्चित केल्या आहेत, त्याविषयी आज आपण जाणून घेऊयात. (How Many Cylinders Are You Legally Allowed To Keep At Home?)
आखाती देशात युद्धाला सुरूवात झाल्यानंतर भारतामध्ये घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती बदल झाला. सरकारकडून किंमती वाढवल्या, त्यात आखाती देशातून येणारा पुरवठा खंडीत झाल्यामुले पुरवठा मात्र मर्यादीत झाला. त्याचा परिणाम व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणावर झाला. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा काळाबाजारही झाल्याचे समोर आले. गॅस सिलिंडरसाठी कुठे दुप्पट, तर कुठे दीडपट किंमत मोजावी लागत आहे. काळाबाजार रोखण्यासाठी सरकारकडून वितरण आणि बुकिंगचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. त्यामुळे एका कुटुंबाला एका वर्षात कायदेशीररित्या किती एलपीजी सिलिंडर ठेवता येतात किंवा बुक करता येतात? असा सवाल उपस्थितीत झाला.
वर्षभरात किती गॅस सिलिंडर बुक करू शकतो?
सध्याच्या नियमांनुसार, एका व्यक्तीला वर्षभरात १४.२ किलो वजनाचे १२ अनुदानित सिलिंडर खरेदी करता येतात. हे सिलिंडर सरकारी योजनांअंतर्गत अनुदानित दराने पुरवले जातात. ५ किलो वजनाचा घरगुती सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी ही मर्यादा ३४ इतकी आहे. म्हणजे, ग्राहकांना प्रत्येक महिन्याला १४.२ किलो वजनाचा फक्त एकच सिलिंडर बुक करता येतो. पण घरगुती ग्राहक बाजारातील दराने अनुदानित कोट्यापेक्षा जास्त सिलिंडरही बुक करू शकतात.त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात.
२५ दिवसांच्या बुकिंगचा नियम -
१४.२ किलो वजनाचे अनुदानित १२ सिलिंडर घेता येतात. पण त्याशिवाय अतिरिक्त पैसे मोजून वर्षभरात आणखी ३ सिलिंडर विकत घेता येता. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीचा गॅस सिलिंडरचा वार्षिक अनुदानित कोटा संपल्यानंतर विनाअनुदानित व्यावसायिक दराने तीन अतिरिक्त सिलिंडर खरेदी करता येतात. दरम्यान, काळाबाजार रोखण्यासाठी सरकारकडून दोन बुकिंगमध्ये २५ दिवसांचे अंतर सुरू केले आहे. सध्या एक कुटुंब वर्षभरात साधारण १५ एलपीजी सिलिंडर बुक करू शकतं. त्यामध्ये १२ अनुदानित आणि ३ विनाअनुदानित सिलिंडरचा समावेश आहे. या बुकिंगसाठी २५ दिवसांच्या अंतराचा नियम पाळावाच लागणार आहे.
एकावेळी घरी किती सिलिंडर ठेवता येतात ?
नियमांनुसार, घरगुती एलपीजी ग्राहकांना एका वेळी घरात जास्तीत जास्त २ सिलिंडर ठेवण्याची परवानगी आहे. यामध्ये वापरण्यासाठी जोडलेला एक सिलेंडर आणि एक अतिरिक्त सिलेंडर बॅकअप म्हणून ठेवण्यात येतो. जर एलपीजी सिलिंडरची जास्त साठवणूक करायची असेल तर २०१६ मधील नियमांनुसार सुरक्षा परवाना गरजेचा आहे. कारण, एलपीजी हे अत्यंत ज्वलनशील इंधन आहे. अनेक सिलिंडर साठवल्याने अपघातांचा धोका वाढतो.पण व्यावसायिक वापरासाठी १०० किलो पर्यंत एलपीजी साठवता येतो.
गॅस सिलिंडरच्या किंमती किती आहेत?
गेल्या आठवड्यात घरगुती आणि व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ६० रूपयांनी वाढली तर व्यावसायिक सिलिंडरचे दर १४४ रूपयांनी वाढले आहेत.
१४.२ किलो वजनाच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती किती?
नवी दिल्ली: ९१३.०० रुपये
मुंबई: ९१२.५० रुपये
बेंगळुरू: ९१५.५० रुपये
जयपूर: ९१६.५० रुपये
नोएडा: ९१०.५० रुपये
हैदराबाद: ९६५.०० रुपये
लखनौ: ९५०.५० रुपये
पटना: १,००२.५० रुपये
१९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती किती?
नवी दिल्ली - १,८८४.५०
मुंबई - १,८३६.००
कोलकाता - १,९८८.५०
चेन्नई - २,०४३.५०
हैदराबाद - २,१०५.५०
पटना - २,१३३.५०
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
