महाराष्ट्र हे एक कुटुंब मानून सातत्याने अनेक कल्याणकारी योजना आखल्या. आमच्या सरकारने गेल्या दोन वर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार केला आहे. लोकोपयोगी योजनांमध्ये शेतकरी, कामगार, महिला-भगिनी, युवा, ज्येष्ठ नागरिक या प्रत्येक घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला असून जनतेचे दुःख हलकं करू शकलो याचे समाधान असल्याचे सांगत राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या धर्तीवर ‘संविधान भवन’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली.
विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, आम्ही गेली दोन वर्ष सुखाचा आणि समृध्दीचा मंत्र घेऊन राज्याचा गाडा रुळावर आणला. आम्ही जनतेच्या दारात जाऊन काम केलं. त्यांच्या समस्या सोडवितानाच हे राज्य सर्व आघाड्यांवर देशात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न केले. आज महाराष्ट्र देशात अनेक पातळ्यांवर अव्वल आहे, ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या महत्वाच्या घोषणा
राज्यात वीरशैव कक्कय्या आर्थिक विकास महामंडळ, महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार.
चंद्रपूर येथील श्री माता महाकाली मंदिर यात्रा परिसर विकास आराखड्यासाठी २५० कोटी देणार.
मुंबई महापालिका सफाई कामगारांच्या सेवा निवासस्थानांचा पुनर्विकास. सफाई कामगारांच्या विस्थापन भत्त्यामध्ये वाढ.
१५ वर्षाच्या आतील परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन ५० रुपये विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती देण्याचा निर्णय
पालघरला विमानतळ करणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत वर्षाला १८ हजार रुपयांचा माहेरचा आहेर आम्ही देतोय. अन्नपूर्णा योजनेंतर्गत वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर, महिलांना ५० टक्के तिकीट दरात आणि ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवासाचा लाभ, शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा, मुलींच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च आता सरकार घेणार आहे, युवा अप्रेंटिंसशीप योजनेतंर्गत १० लाख सुशिक्षित तरुणांना १० हजार रुपयांपर्यंतचा स्टायपेंड, महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती दीड लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढविली, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थस्थळ दर्शन योजनाही आणली एका सुखी कुटुंबासाठी काय हवं काय नको याचा विचार करून सरकारने योजना आखल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.