भाजप आमदार चंद्रपाल सिंह लोधी यांच्या कारला अपघात
गंगा एक्सप्रेसवेवर भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात
कार अपघाताटा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर
टायर फुटल्याने भाजप आमदाराची कार खांबाला धडकली
भाजप आमदार अपघातानंतर रुग्णालयात दाखल
उत्तर प्रदेशमध्ये भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली. बुलंदशहरजवळ गंगा द्रुतगती मार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये भाजप आमदारासह तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या अपघातामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगा द्रुतगती मार्गावर भाजप आमदार चंद्रपाल सिंह लोधी यांच्या कारला शनिवारी सायंकाळी अपघात झाला. आमदार लखनऊवरून गाझियाबादकडे जात होते. मुसळधार पाऊस सुरू असताना गंगा द्रुतगती मार्गावर त्यांच्या कारचा टायर अचानक फुटला. त्यांची कार १२० च्या स्पीडमध्ये होती. टायर फुटल्यानंतर कार महामार्गावरून २०० मीटरपर्यंत घसरत रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला जाऊन धडकली. ही घटना स्याना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोटा काबुलपूर गावाजवळ घडली.
आमदार चंद्रपाल सिंह लोधी यांच्या भरधाव कारचा टायर फुटल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले. या भीषण अपघातामध्ये भाजप आमदार चंद्रपाल सिंह लोधी आणि त्यांचे एक सहकारी गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि द्रुतगती मार्गावरील मदत पथके घटनास्थळी दाखल झाली. दोन्ही जखमींना गाडीतून तातडीने बाहेर काढून हापूर येथील एका मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये आणखी एक जण किरकोळ जखमी झाला आहे त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.
गंगा द्रुतगती मार्गावरील अपघातानंतर विरोधी समाजवादी पक्षाने सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महामार्गाच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सपाने म्हटले की, 'गंगा द्रुतगती मार्गावर भाजपच्या भ्रष्टाचाराच्या नद्या वाहत आहेत.' नाव बदलण्याच्या राजकारणावर टीका करताना सपा पक्ष म्हणाला की, 'नावे बदलणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. याचे नाव 'गंगा एक्सप्रेस वॉटरवे' ठेवा. हे अत्यंत निंदनीय आहे.' विरोधी पक्षाच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर एका नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.