पुण्यात FDA ची मोठी कारवाई
बुधवार पेठ परिसरातून सुमारे 37 लाख रुपये किमतीचा खवा आणि पनीर जप्त
17 हजार किलो संशयित साठा
परराज्यातून आवक असल्याचा संशय
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली असताना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) भेसळयुक्त आणि संशयित खाद्यपदार्थांविरोधात कारवाईला वेग दिला आहे. पुण्यातील बुधवार पेठ परिसरात एफडीएच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 37 लाख रुपये किमतीचा खवा आणि पनीर जप्त केला आहे. या कारवाईमुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बुधवार पेठ परिसरात खवा आणि पनीरची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याची माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणी तपासणी केली. यावेळी संशयित खवा आणि पनीर घेऊन आलेल्या दोन ते चार कंटेनरमधून नमुने घेण्यात आले. हे कंटेनर परराज्यातून पुण्यात दाखल झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या कारवाईत तब्बल 5 हजार किलो खवा आणि 12 हजार किलो पनीर आढळून आले. त्याची एकूण किंमत सुमारे 37 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. एफडीएने हा साठा ताब्यात घेतला असून, त्यातील नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. गणेशोत्सवात मिठाई, मोदक, पेढे तसेच विविध दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असते. त्यामुळे या काळात खवा आणि पनीरचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर आलेल्या संशयित मालामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
पुणे शहरात खवा आणि पनीरचे मोठ्या प्रमाणात वितरण बुधवार पेठ परिसरातून होत असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. त्यामुळे या कारवाईनंतर एफडीएकडून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, जप्त केलेल्या खवा आणि पनीरच्या नमुन्यांचा प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतरच हे पदार्थ भेसळयुक्त आहेत की खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेच्या निकषांचे उल्लंघन झाले आहे, हे स्पष्ट होणार आहे. तपासणीच्या निष्कर्षानंतर संबंधितांवर कोणती कारवाई करायची, याबाबत एफडीएकडून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी मिठाई, खवा, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना गुणवत्ता आणि विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.