रविंद्र धंगेकर यांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप
गौतमी पाटील प्रकरणातील चंद्रकांत पाटील यांचा व्हायरल फोन कॉलमुळे नव्या वादाला फुटलं तोंड
आमदार हेमंत रासने यांनी चंद्रकांत पाटील यांची बाजू घेत आरोप फेटाळले
पुण्यात महायुतीतून भाजप-शिवसेना संघर्ष उफाळून आलाय
गुन्हेगारी चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून चालते, असा आरोप महायुतीमध्ये असलेले शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केल्यानंतर भाजप विरुद्ध शिवसेना या संघर्षाची ठिणगी पुण्यात पेटली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेले आरोप बिनबुडाचे आहेत असं मत आमदार हेमंत रासने यांनी व्यक्त केलं आहे. धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल आणि वक्तव्याबद्दल महायुती मधील वरिष्ठ नेते आम्हाला सूचना करतील आणि आम्ही सुद्धा त्यांच्याशी याबाबत चर्चा करू. महायुतीमध्ये ते आहेत, त्यांच्यावर काय बोलावं यावर वरिष्ठ नेत्यांकडून येत नाही. तोपर्यंत मी युती धर्म पाळणार असं सुद्धा रासने म्हणाले.
गुंड निलेश घायवळ प्रकरण आणि गौतमी पाटीलच्या चालकाने केलेला अपघात, पुण्यात गेल्या काही दिवसांपासून या दोन विषयांची जोरदार चर्चा सुरू आहे. "गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?" पोलिसांसोबत मंत्री चंद्रकात पाटील यांनी केलेलं संभाषण व्हायरल झालं. त्यावरून विविध स्तरातून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. तसचं निलेश घायवळ आणि पुण्यातील गुन्हेगारी बद्दल सुद्धा सत्ताधाऱ्यांवर आरोप होत असतानाच शिवसेनेनं पुण्यात भाजपला घरचा आहेर दिला आहे.
'गुन्हेगारांना जात धर्म पक्ष नसतो. चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमधून गुन्हेगारी चालते. पुणेकर म्हणून बोलायचं अधिकार मला लोकशाहीने दिला आहे. चंद्रकांत पाटलांना लाख-लाखाने लोकं निवडून देतात असे गुन्हेगार पाळायला लोक परवानगी देतात का? चंद्रकांत पाटलांचा ऑफिसमध्ये समीर पाटील नावाचा कोणतरी व्यक्ती आहे, हा मोकातील आरोपी आहे, हा गुन्हेगारी चालवतो, हा पोलिसांवर दादागिरी करतो, चंद्रकांत दादा चा फोन वापरून पोलिसांच्या बदल्या करतो" असा आरोप धंगेकर यांनी केला.
"चंद्रकांत पाटील दहा वर्षे आमदार पुण्यातून झाले आणि त्यांनी पुणेकरांना गुन्हेगारी दिली. चंद्रकांत पाटलांनी हे पाप लवकर धवून टाकावी नाहीतर हा काळा डाग मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही लागेल," अशी बेधडक टीका युतीमध्ये असलेल्या धंगेकर यांनी केली.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री त्यासोबतच कोथरूड चे आमदार यांची पाठराखण करण्यासाठी भाजप आमदार पुढे सरसावले आहेत. रासने म्हणाले, "सर्व सामान्य कुटुंबीय मधून आलेल्या एका रिक्षा चालकाला मदत मिळावी म्हणून त्यांनी पोलिसांना फोन केला. चंद्रकांत दादा यांचे पहिलं वाक्य वगळलं तर त्यांनी मदतीच्या भावनेने पोलिसांना फोन लावला होता. पोलिस प्रशासनाने निलेश घायवळ विरोधात योग्य भूमिका घेतली आहे. चंद्रकांत दादा यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्या फोन चे पहिलं वाक्य घेतलं तर रोष नक्की आहे पण पूर्ण वाक्य घेतलं तर ती बोली भाषा आहे. शब्द आणि त्या मागचा हेतू बघायला पाहिजे."
"मी तो विषय फार गंभीर मनाने घेत नाही. त्यांनी केलेल्या विधानाचा निर्णय काय घ्यायचा हे युती मधील वरिष्ठ नेते घेतील," असं ही रासने म्हणाले. 'येता काळ हा स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा आहे. पुणे शहर भाजप चे सत्ताकेंद्र आहे, निवडणुकीत महायुती म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी लढेल का हे वेळच सांगेल पण त्याआधी युती मध्ये पडलेला हा मिठाचा खडा बाजूला कोण करणार हे पाहणं महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.