पुणे महानगर पालिकेमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदीची बातमी आहे. पुणे महानगर पालिकेच्या १८ हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची दिवळी आणखी गोड होणार आहे. त्यांना दिवाळीपूर्वी ८.३३ टक्के बोनस त्याचप्रमाणे २३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे. यासंदर्भात वित्त व लेखा विभागाने परिपत्रक काढले आहे. त्यामुळे पुणे महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पुणे महापालिकेकडून दरवर्षी महापालिका अधिकारी, कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान आणि बोनस देण्याचा निर्णय दिला जातो. यासाठी अर्थसंकल्पात सुमारे १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेत नगरसेवक असताना यासाठी स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मंजूर केला जातो. तसेच हा प्रस्ताव मंजूर करून घेतल्यानंतर याचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चढाओढ लागत होती. पण आता महापालिकेवर प्रशासक असल्याने ही प्रक्रिया सहज पूर्ण होत आहे.
लेखा व वित्त विभागाने काढलेल्या परिपत्रकात १८ ऑक्टोबरपर्यंत सर्व बिले तपासून घेण्याचे आदेश विभाग प्रमुखांना देण्यात आले असून दिवाळीपूर्वी ही रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे. २०२३-२४ च्या मूळ वेतन, महागाई भत्ता यावर ८.३३ टक्के आणि २३ हजार रुपये सानुग्रह अनुदान उपस्थितीच्या प्रमाणात दिले जाणार आहे.
गेल्या वर्षभरात संबंधित सेवकांची प्रत्यक्ष हजेरी किमान १८० दिवस असणे आवश्यक आहे अशांना ही रक्कम दिली जाणार आहे. सानुग्रह अनुदानाबाबतच्या अन्य अटी आणि शर्ती तसेच सेवापुस्तक आणि वेतन बिलावर ठेवावयाचे दाखले याबाबतचा तपशील दिलेला आहे. त्यानुसार तजवीज करावी. तसेच संघटना निधीची कपात करण्यात येणार आहे, असे पुणे महानगर पालिकेच्या परिपत्रकात नमूद केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.