पुणे-बेंगळुरू बायपासवरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी प्रस्तावित केलेल्या उपाययोजनांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी सहमती दर्शविली आहे. नितीन गडकरी यांनी या उपाययोजनांना हिरवा कंदील देताच त्यासाठी तातडीने ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
पुणे-बेंगळुरू बायपास रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी वाहतूक पोलिसांबरोबर चर्चा करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यासोबत उपाययोजनांचा आराखडा तयार केला होता. पुणे पोलिस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करत आराखडा तयार केला. त्यानंतर पुणे दौऱ्यावर असलेल्या नितीन गडकरी यांच्यासमोर या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर नितीन गडकरी यांनी या उपाययोजनांना सहमती दिली आणि ३०० कोटींचा निधी तत्त्वत: मंजूर करण्यात आल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
- पुणे महानगर पालिकेच्या माध्यमातून भूमकर अंडरपास शेजारी प्रीकास्ट बॉक्स पद्धतीचा जोड अंडरपास करण्यात येणार आहे.
- ननावरे अंडर पासजवळ किया शोरुम येथे आणि रेनॉल्ट शोरुम याठिकाणी प्रत्येकी एक असे दोन अंडरपास प्रस्तावित आहेत.
- नवले ब्रीज याठिकाणी नऱ्हेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी एक मार्गिकेवर कॉन्टिलिव्हर ब्रीज बांधून इतर सर्व मार्गिका सिग्नलमुक्त करण्यात येणार आहे.
- पाषाण- सूस रस्त्यावरून महामार्गाला जोडणारा जोड रस्ता आणि सेवा रस्त्याची कामे करण्यात येणार आहेत.
- राधा हॉटेल येथील पीएमपीएमएलची जागा आणि हॉटेल ऑर्किड समोरील जागेवर १०० मीटर मार्जिन रस्ता प्रस्तावित असून याठिकाणी अंडरबायपास तयार करण्यासाठी व्यवहार्यता तपासणी करण्यात येणार आहे.
- पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांपैकी २७.९९ किलोमीटर लांबीचे आणि १२ मीटर रुंदीचे सेवा रस्ते प्रस्तावित आहेत.
- पुणे महापालिकेकडून ४९.१२ लांबीचा आणि १२ किलोमीटर रुंदीचा बायपास सेवा रस्ता तयार करण्यात येणार आहे. बालेवाडीकडून मुंबईला जोडण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजित आहे.
- गेल्या ५ वर्षांत जवळपास २० लाख वाहनांची वाढ झाली आहे. पुण्यात २०१८ मध्ये वाहनांची संख्या ५२ लाख होती. २०२४ मध्ये वाहनांची संख्या ७२ लाख झाली.
- पुण्यात दररोज १३०० नव्या वाहनांची भर पडते. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या वाढत आहे.
- पुण्यात रिंग रोड नसल्यामुळे पुणे-बेंगळुरू रस्त्याचा वापर रिंग रोड म्हणून केला जातो.
- पुणे- बेंगळुरू महामार्गाची निर्मिती १९९४ मध्ये दुपदरी महामार्ग म्हणून करण्यात आली होती. हा बायपास २००० मध्ये रस्ता वाढवून चौपदरी करण्यात आला.
- २०१० मध्ये सहापदरी रस्ता प्रस्तावित करण्यात आला असून त्याची कामे अनेक ठिकाणी प्रगतीपथावर आहेत.
- मागच्या ३ वर्षांमध्ये १०० पेक्षा जास्त अपघात झाले असून त्यामध्ये ६८ जणांना आपला जीव गमवावा लागला. तर ५४ जण गंभीर जखमी झाले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.