सागर आव्हाड, पुणे|ता. २२ सप्टेंबर
Jagdish Mulik Claims on Wadgaon Sheri Assembly: पुण्यामधील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या वडगाव शेरी मतदार संघांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनिल टिंगरे यांची सत्ता आहे, त्यामुळे साहजिकच ही जागा राष्ट्रवादीला सुटणार हे निश्चित आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाचे नेते जगदीश मुळीक यांनीही या जागेवर दावा ठोकला असून विधानसभेच्या निवडणुका समोर येऊन ठेपल्या आहेत. आपली साथ, प्रेम आणि आशीर्वाद पुन्हा हवे आहेत, असे म्हणत जगदीश मुळीक यांनी थेट पत्रामधून मतदारांना साद घातली आहे. जगदीश मुळीक यांच्या या थेट भुमिकेमुळे भाजप- राष्ट्रवादीत संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो,
पत्ररूपाने तुमच्याशी संवाद साधताना मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे. माझी सामाजिक आणि राजकीय वाटचाल तुमच्या सहकार्याने बहरली. तुमचे प्रेम, साथ आणि आशीर्वाद भरभरून लाभले. माझ्यासाठी हे आशीर्वाद बहुमोल आहेत. माझ्या विस्तारीत कुटुंबाशी म्हणजेच तुमच्याशी संवाद साधताना खूप समाधानाची भावना आहे. कुटुंबातूनच मला समाजकार्याचे बाळकडू मिळाले. समाजकारणाचा पिंड जोपासला गेल्यानेच २००१ मध्ये विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून राजकीय प्रवास सुरू झाला.
२०१४ मध्ये वडगावशेरी मतदारसंघाचा आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी तुमच्यामुळेच लाभली. त्या पाच वर्षांत आपल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मतदारसंघाला एक नवे रूप दिले. भामा आसखेड, शंभर खाटांचे रुग्णालय, मेट्रो, उड्डाणपुल यांसारखे अनेक प्रकल्प मार्गी लावले. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत कृतीशील राहिलो. आपल्या अथक प्रयत्नांनंतरही २०१९ साली विधानसभा गाठण्यात थोडक्यात अपयश आले. पराभवानंतर दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. तुमची साथ होतीच, त्यामुळे दुप्पट जोमाने लढण्यासाठी, समाजसेवेसाठी सज्ज झालो.
भाजपचा शहराध्यक्ष असताना राज्यातील त्यावेळच्या सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले. कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांना आधार देण्याची आणि आरोग्यसेवा पुरवण्याची गरज होती. ती पक्षसंघटनेच्या माध्यमातून पूर्ण केली. विकासकामांसाठी आणि जनतेच्या हक्कासाठी आंदोलने केली, पक्ष संघटना वाढवली आणि मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडत राहिलो.
शिक्षक सन्मान, विद्यार्थी सत्कार, महिला सन्मान, आरोग्य शिबिरे, स्पर्धांचे आयोजन, सर्व सार्वजनिक उत्सव, बागेश्वर धाम, जया किशोरी यांचे प्रवचन अशा अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करीत गेलो. विधानसभेच्या निवडणुका समोर येऊन ठेपल्या आहेत. आपली साथ, प्रेम आणि आशीर्वाद पुन्हा हवे आहेत. यावेळी तुमच्या या सेवकाला अजून ताकदीने आणि अधिक जोमाने आपल्या सहकार्याची आवश्यकता लागेल. याच हेतूने आपल्याशी हा संवाद. तुमचे सहकार्य लाभेल हा विश्वास आहे, असे जगदीश मुळीक यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.