अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी
राष्ट्रपती शौर्यचक्रप्राप्त आयपीएस अधिकारी सोमय विनायक मुंडे यांची बदली पुणे शहर पोलिस दलात उपायुक्त म्हणून झाली आहे. लातूरचे पोलिस अधीक्षक राहिलेले मुंडे यांची मे महिन्यात छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलिस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. आता अवघ्या १ महिन्याच्या आत त्यांची पुन्हा बदली करून थेट पुणे शहरात बदली करण्यात आली आहे.
आय पी एस अधिकारी असलेले मुंडे हे केमिकल इंजिनियर आहेत. त्यांचे वडील आणि आई दोघे ही वैद्यकीय क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. केमिकल इंजिनियर ची पदवी घेण्यापूर्वी मूळचे देगलूर चे मुंडे यांनी साताऱ्याच्या सैनिकी शाळेतून सातवीपर्यंत शिक्षण घेतलं त्यानंतर डेहराडून मधून दहावी उत्तीर्ण करत हैदराबाद येथे माध्यमिक ची पदवी मिळवली. त्यानंतर पवई आय आय टी मधून मुंडे हे केमिकल इंजिनियर झाले. २०१६ मध्ये ते आय पी एस झाल्यानंतर त्यांनी वैजापूर मध्ये प्रोबेशनारी अधिकारी म्हणून काम पाहिलं. अमरावती येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणून काम केलेले मुंडे यांनी २०२१ मध्ये गडचिरोली मध्ये नक्षल ऑपरेशन्सचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलं. त्यानंतर त्यांना लातूरचे पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली.
गडचिरोली मधील मरदीन टोला परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केलं होतं. या मोहिमेची जबाबदारी मुंडे यांच्यावर होती. छत्तीसगढ येथील अबुजमाळ आणि गडचिरोली मधील अटापल्ली येथे झालेल्या नक्षलवादी विरोधी कारवाई मध्ये सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका पार पाडली. गडचिरोली मध्ये विशेष मोहिमेचे नेतृत्व करताना त्यांनी 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. नक्षलवाद्याच्या समुहावर 1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करत नक्षलवादाचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे ज्याच्यावर 50 लाखाचे बक्षीस होतं त्याचाही खात्मा केला. या कामगिरीबद्दल २०२२ मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.
यावर्षीच्या मे महिन्यात गृह विभागाने दिलेल्या आदेशानुसार, मुंडे यांची लातूर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक पदी झाली होती. त्यानंतर अवघ्या एक महिन्यात त्यांची पुन्हा एकदा बदली झाली असून ते आता पुणे शहराच्या उपायुक्त पदी कार्यरत होणार आहेत. शुक्रवारी गृह विभागाने जारी केलेल्या आदेशात राज्यातील तब्बल ५२ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यातील तीन जणांची बदली पुणे शहरात पोलिस उपआयुक्त पदी करण्यात आली आहे. यामध्ये मुंडे यांच्यासह राजलक्ष्मी शिवणकर आणि कृषिकेश रावले यांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.