खासगी बस चालकांकडून प्रवाशांची लूट सुरूच
दिवाळीत पुणे ते नागपूर खासगी बसचे भाडे वाढ
पुणे ते जळगाव एसी स्लीपर बसचे तिकीट दर देखील वाढले
दिवाळीत खासगी बस चालकांकडून जादा भाडे आकारणी सरू
दिवाळीमध्ये खासगी बस चालकांचा मनमानी कारभार पाहायला मिळत आहे. खासगी बस कंपन्यांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. नेहमीच्या भाड्यापेक्षा दोन ते तीन पट जास्त भाडे आकारले जात असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही मार्गांवर तर ७००० रुपयांपर्यंत बसचे भाडे वाढवले आहे. अशातच दिवाळीच्या काळात मनमानी पद्धतीने भाडे आकारणाऱ्या खासगी कंपन्यांविरोधात पुणे आरटीओ कडून २३ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. दिवाळीत ज्या प्रवाश्यांची फसवणूक खासगी बस ऑपरेटर्सकडून होत असेल तर त्याबाबत व्हॉट्सअॅपद्वारे आरटीओकडे तक्रार करण्याचे आवाहन प्रवाश्यांना केले जात आहे. यासाठी आरटीओने एक व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. मात्र असं असलं तरी सुद्धा काही खासगी बस कंपन्यांकडून लूट सुरूच आहे.
दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिक आपापल्या गावी जात असतात. या कालावधीत खासगी बस चालकांकडून किंवा ट्रॅव्हल एजन्सीकडून जादा भाडे आकारण्यात येत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.दिवाळी सणाचे निमित्त आणि नफ्याचा फायदा विचारात घेऊन काही खासगी बस ऑपरेटर्सकडून प्रवाशांची फसवणूक केली जाते. तिकीटदर दुप्पट केल्याने प्रवाश्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागतायत.
पुण्यात साम टीव्ही ने केलेल्या रिॲलिटी चेक मधून पुणे ते जळगाव आणि पुणे ते नागपूर या प्रवासाचे दर तुम्ही ऐकलेत तर तुम्ही तुमचा प्रवास पुढे ढकलाल. पुण्यातून सर्वाधिक प्रवासाची पसंती असलेले ठिकाण म्हणजे नागपूर. पुण्यातून नागपूरला जाण्यासाठी आजच्या तारखेला तब्बल चार हजार २०० रुपये मोजावे लागत आहेत. पुण्यातून नागपूरला जाण्यासाठी एसी स्लीपर खासगी बस चे दर ४२०० आहेत तर पुण्यातून जळगावला पोहोचण्यासाठी तब्बल १५०० रुपये दर खासगी बस चालकांकडून आकारले जात आहेत.
पुणे ते नागपूर (ए सी स्लीपर, आजच्या तारखेला)
दर: ४२०० प्रति
पुणे ते जळगाव (ए सी स्लीपर, आजच्या तारखेला)
दर: १५०० प्रति
नागपूर ते पुणे (ए सी स्लीपर, दिवाळीनंतर)
दर: ९०० प्रति
जळगाव ते पुणे (ए सी स्लीपर, दिवाळीनंतर)
दर: ९०० प्रति
खासगी बस भाडं म्हणजे शेअर मार्केट आहे कधी रेट उतरतात तर कधी रेट वाढतात अशी प्रतिक्रिया सुद्धा एका कंपनीच्या एजंट यांनी दिली. खासगी बस चालकांनी केलेल्या दाव्यानुसार, 'आरटीओकडून आम्हाला तीन पट जादा भाडे आकारण्याची मुभा आहे. तसेच इतर दिवशी खासगी बस कंपन्यांचे मालक हे त्यांच्या खिशातून डिझेल पेट्रोल किंवा इतर खर्च उचलतात जो त्यांना परवडत नाही यासाठीच दिवाळीमध्ये दरवाढ केली जाते.' तसंच, हेच दर जर तुम्ही दिवाळीनंतर जायचं ठरवलं तर तुम्ही पुणे ते नागपूर ९०० रुपयांत जा.' असं देखील यावेळी सांगण्यात आलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.