Black And White : साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शरणकुमार लिंबाळे यांची Exclusive मुलाखत

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद किंवा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने अस्पृश्यतेचा कलंक पुसला जात नाही, असे ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांनी स्पष्ट केले. सकाळ समूहाच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' कार्यक्रमातील त्यांच्या मुलाखतीत नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या.
Sharan Kumar Limbale
Sharan Kumar Limbale
Published On: 

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाल्याने अस्पृश्यतेचा कलंक पुसला जात नाही; त्यासाठी सामाजिक समतेची लढाई कायम लढावी लागेल, अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांनी मांडली आहे. ‘सनातन’मधील सिद्धनाकच्या कथेतून अस्पृश्यतेची वेदना मांडताना, कितीही स्नान केले तरी अस्पृश्याला अस्पृश्यच ठरवले जात असल्याची जातिव्यवस्थेतील विडंबना त्यांनी अधोरेखित केली. एखाद्या पदावर पोहोचल्याने जातीय कलंक मिटत नसून सामाजिक परिवर्तनासाठी दीर्घ संघर्ष आवश्यक असल्याचे लिंबाळे म्हणाले. दलित साहित्यामुळे वाचकांना जातिव्यवस्थेतील अन्याय समजला आणि पुस्तकं समाज बदलू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सकाळ समूहाचे संपादक निलेश खरे यांच्या ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांची मुलाखत घेण्यात आली.

आंबेडकरी चळवळीत वाढलेल्या गटबाजीमुळे समाजाचे मोठे नुकसान होत असल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांनी व्यक्त केली आहे. दलित पँथरच्या काळात समाजात असलेले मानसिक ऐक्य आज संपुष्टात आल्याचे सांगत, चळवळीतील गटबाजी आणि ट्रोलर्सवर त्यांनी जोरदार टीका केली. समाजाला पुढे नेणाऱ्या लेखक आणि कार्यकर्त्यांची ताकद टीका करण्यात वाया घालवू नका, असे आवाहनही लिंबाळे यांनी केले आहे.

शरणकुमार लिंबाळे यांनी आंबेडकरी चळवळीने नव्या प्रगतिशील तरुणांना सोबत घेऊन जातीय व्यवस्थेविरोधातील लढाई लढण्याची गरज व्यक्त केली आहे.. आज बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा विचार समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचला असून, दलित चळवळीने आपले मित्र वाढवले पाहिजेत, अंतर्गत संघर्ष कमी केले पाहिजेत, असं मत त्यांनी मांडलंय.. मतांची ताकद परिवर्तनासाठी वापरली गेली तरच राजकीय प्रतिनिधित्व मिळू शकतं, असंही लिंबाळे म्हणाले.

ज्या विचारधारेच्या विरोधात तुम्ही ४५ वर्षांपूर्वी विद्रोही भूमिका घेऊन आलात, आज त्याच साहित्याच्या सर्वोच्च व्यासपीठावर अध्यक्षपदी निवड झाल्यावर तुम्हाला कसे वाटते?

उत्तर: मला याचा मोठा आनंद आणि सन्मान वाटतो. मी अस्पृश्य आणि दलित म्हणून जन्मलो, त्यामुळेच मी संघर्ष करू शकलो आणि गुलामीविरुद्ध उठाव करू शकलो. सवर्ण समाजात जन्मलो असतो तर मला हा क्रांतिकारक प्रवास करता आला नसता. हा माझ्या सामाजिक न्यायाच्या लढाईचा आणि बाबासाहेबांच्या विचारांचा गौरव आहे. फुले-आंबेडकरांनी पाहिलेले स्वप्न पुढे नेण्याचा हा क्षण आहे.

तुमच्यावर होणारी टीका आणि ट्रोलिंग याकडे तुम्ही कसे पाहता?

उत्तर: आंबेडकरी चळवळीतील अनेक लोक माझे अभिनंदन करत आहेत, तर काही लोक मला ट्रोल करत आहेत. चळवळीत गट आहेत; एक गट पुरोगामी आणि व्यापक भूमिका घेणारा आहे, तर दुसरा मूलतत्त्ववादी आणि स्वतःच्या गल्लीत राहणारा आहे. ट्रोल करणाऱ्यांना बाबासाहेबांचे साहित्य किंवा माझा त्याग माहिती नाही; विरोधक गटातील काही लेखक त्यांना फूस लावतात. मी कोणाशीही राजकीय हात मिळवणी केलेली नाही; माझी हात मिळवणी फक्त आंबेडकरी चळवळीशी आणि बाबासाहेबांच्या विचारांशी आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर बसल्यानंतर किंवा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही 'अक्करमाशी' किंवा 'दलित लेखक' हा शिक्का पुसला जाईल का?

उत्तर: कदापि नाही. द्रोपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्या तरी 'आदिवासी राष्ट्रपती' आणि सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले तरी 'दलित मुख्यमंत्री' म्हटले जाते. तसेच माझाही उल्लेख होतो. एका पदामुळे किंवा गौरवामुळे अस्पृश्यतेचा कलंक नष्ट होणार नाही; त्यासाठी सामाजिक समतेचा दीर्घकालीन संघर्ष करावा लागेल.

'अक्करमाशी' म्हणजे काय आणि तुमच्या बालपणातील संघर्षाचे अनुभव कसे होते?

उत्तर: 'मासा' म्हणजे एक तोळा आणि 'अक्करमाशी' म्हणजे तोळ्याला एक कमी. जन्माने मिळणारी प्रतिष्ठा मला मिळाली नाही. बालपणात ज्या दलित वस्तीत मी जगलो, तिथेही माझी निंदा आणि हेटाळणी झाली; मला टोमणे मारले गेले. सवर्णांकडून आणि स्वतःच्या समाजातील काही प्रवृत्तींकडूनही मला छळ सहन करावा लागला. हीच टीका करणारी प्रवृत्ती आजही काही प्रमाणात जिवंत आहे, जी बदलणे गरजेचे आहे.

आजच्या दलित चळवळीची आणि नवीन पिढीच्या भूमिकेकडे तुम्ही कसे पाहता?

उत्तर: पूर्वी दलित पँथर आणि नामांतराच्या काळात चळवळीत मानसिक ऐक्य होते, पण आज गटबाजीमुळे चळवळ विखुरलेली आणि पोखरलेली दिसते. चळवळीतील अंतर्गत शत्रू आणि गटबाजी कमी करून मित्र वाढवले पाहिजेत. एक जात क्रांती किंवा सत्ता बदल घडवू शकत नाही. आज अनेक सवर्ण मुले आणि नेतेही 'जय भीम' म्हणत आहेत, संविधानाचे नाव घेत आहेत. या पुरोगामी शक्तींना सोबत घेऊन आणि जातीची चौकट मोडून पुढे जाण्याची गरज आहे.

अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आणि त्यानंतर तुम्ही कोणते काम करणार आहात?

उत्तर: आता माझे कार्यक्षेत्र वाढले आहे. केवळ भीमनगर पुरते न राहता विविध समाजघटकांपर्यंत बाबासाहेबांचा विचार पोहोचवणे, नवीन लिहिणाऱ्या लेखकांना प्रोत्साहन देणे आणि बृहन्मुंबई व बृहन्महाराष्ट्रातील मराठी संस्था, मासिके आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणे, यावर मी भर देईन. जातीव्यवस्था मोडून मराठी भाषेला आणि समाजाला पुढे नेणे हेच उद्दिष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.