Finger Reattachment Surgery saam tv
मुंबई/पुणे

Finger Reattachment Surgery: घराच्या दरवाज्यात अडकून तुटलं बोट, हाडांचा चुराडा झाला; डॉक्टरांनी १८ तास झुंज देत जोडलं बोट

Door Crush Injury: मुंबईतील 75 वर्षीय व्यक्तीचं दरवाज्यात अडकून तुटलेलं बोट 18 तासांनंतर मायक्रोसर्जरीद्वारे यशस्वीपणे पुन्हा जोडण्यात आलं. तज्ज्ञ डॉक्टरांनी वेळेवर उपचार, तुटलेल्या अवयवाचं योग्य जतन आणि मायक्रोसर्जरीचं महत्त्व स्पष्ट केलं.

Surabhi Jayashree Jagdish

नेहमीप्रमाणे संध्याकाळी फिरून घरी परतलेल्या लोअर परळमधील 75 वर्षीय भगवानी सिंग यांच्यासोबत काही क्षणांतच गंभीर अपघात झाला. घरातील दोन खिडक्यांमधून आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे जड दरवाजा अचानक बंद झाला आणि त्यामध्ये त्यांचा हात अडकला. या अपघातात त्यांच्या हाताच्या तर्जनीचं बोट पूर्णपणे तुटले. तर बाजूच्या बोटालाही गंभीर दुखापत झाली.

हात दरवाज्यातून काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पुन्हा एकदा जोराच्या वाऱ्यामुळे दरवाजा बंद झाला आणि त्यांच्या कपाळालाही जबर मार बसला. या दुखापतीमुळे त्यांच्या कपाळावर टाके घालावे लागले. अपघातानंतर तब्बल 18 तासांनी मुंबईतील परळच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटलमधील मायक्रोसर्जरी तज्ज्ञांच्या पथकाने त्यांच्या तुटलेल्या बोटाची यशस्वी पुन्हा जोडणी केली.

हात, मनगट, ब्रॅकिअल प्लेक्सस आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. कुशल शाह यांनी सांगितलं की, दरवाज्यात हात अडकल्यामुळे रुग्णाच्या तर्जनीच्या मधल्या हाडाचा पूर्ण चुराडा झालाय. सुरुवातीला त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पुढच्या उपचारांसाठी ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. दुखापत होऊन बराच वेळ झाल्यामुळे ही शस्त्रक्रिया अधिक कठीण बनली होती.

रुग्णाचं वय, दुखापतीचं स्वरूप आणि तुटलेल्या बोटाची अवस्था यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर तसंच उपचारांशी संबंधित सर्व धोके कुटुंबीयांना समजावून सांगितल्यानंतर बोट पुन्हा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. हाताच्या दुखापतीत शक्य तितकी बोटाची लांबी, स्पर्शाची जाणीव आणि हाताची कार्यक्षमता कायम ठेवणं महत्त्वाचं असतं. योग्य उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने वृद्ध रुग्णांमध्येही बोटाची पुन्हा जोडणी करणं, बोट कायमचं काढून टाकण्यापेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे रुग्णाला चांगला फायदा होतो.

डॉ. शाह यांनी सर्वप्रथम तुटलेल्या हाडांची योग्य पद्धतीने जुळवाजुळव करून ती स्थिर केली. त्यानंतर बोट वाकवणारे आणि सरळ करणारे स्नायूंचे टेंडन्स अतिशय काळजीपूर्वक जोडले. त्यामुळे पुढील मायक्रोसर्जरीसाठी आवश्यक असलेला मजबूत आधार तयार झाला.

यानंतर प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. राघव मागो यांनी ऑपरेटिंग मायक्रोस्कोपच्या मदतीने बोटातील अतिसूक्ष्म धमन्या आणि शिरा पुन्हा जोडल्या. दुखापतीनंतर जवळपास 18 तासांनी तुटलेल्या बोटामध्ये पुन्हा रक्तपुरवठा सुरू करण्यात त्यांना यश मिळालं.

डॉ. मागो यांनी सांगितलं की, तुटलेल्या बोटामध्ये पुन्हा रक्ताभिसरण सुरू करणं हा संपूर्ण शस्त्रक्रियेतील सर्वात कठीण टप्पा होता. संबंधित रुग्णाला मधुमेह होता. तसंच अनेक वर्षांपासून त्यांना तंबाखू चघळण्याची सवय होती. या दोन्ही कारणांमुळे रक्तवाहिन्यांचं कार्य कमी झालं होतं. त्यामुळे जखम भरून येण्यास विलंब होण्याबरोबरच रक्ताच्या गाठी तयार होणं, संसर्ग होणं आणि इतर गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका अधिक होता.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, धारदार वस्तूमुळे बोट तुटल्यास होणाऱ्या दुखापतीपेक्षा दरवाज्यात अडकून बोट चिरडल्याने झालेली दुखापत अधिक गंभीर असते. अशा वेळी धमन्या, शिरा, मज्जातंतू आणि बोटाभोवतीच्या मऊ ऊतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यातच उपचाराला उशीर झाल्यास किंवा रुग्णाला इतर आजार असल्यास गुंतागुंत वाढण्याची शक्यता अधिक असते.

उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, बोटाची पुनर्जोडणी केवळ बोट वाचवण्यासाठी केली जात नाही. बोटाची लांबी, स्पर्शाची जाणीव, वस्तू पकडण्याची क्षमता आणि हाताचे नैसर्गिक कार्य टिकवून ठेवणे हा त्यामागील मुख्य उद्देश असतो. विशेषतः वृद्ध व्यक्तींना दैनंदिन कामं स्वतः करता यावीत आणि त्यांचं जीवनमान सुधारावं, यासाठी हा उपचार महत्त्वाचा ठरतो.

या घटनेमुळे हाताला गंभीर दुखापत झाल्यानंतर रुग्णाला शक्य तितक्या लवकर रुग्णालयात दाखल करणं, तुटलेला अवयव योग्य प्रकारे जतन करणं आणि वेळेत मायक्रोसर्जरी करणं किती महत्त्वाचे आहे, याबाबत जनजागृती होणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: घरबसल्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनांना पाठिंबा देणाऱ्या ठाकरे गटावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात

कुरकुरीत चायनिज मंच्युरियन्स, आता घरीच बनवा सोप्या पद्धतीने

Wari Accident : वारीत पुन्हा भीषण अपघात, भरधाव पिकअपने वारकऱ्यांना दिली जोरात धडक

ढाण्या वाघ मंत्रिमंडळात, भावी कॅबिनेट मंत्री...; धनंजय मुंडे यांच्या बॅनर्सने राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

Vande Bharat Sleeper : गुड न्यूज! १७ जुलैला सुरू होतेय नवी वंदे भारत स्लीपर; जाणून घ्या मार्ग, थांबे अन् तिकिटांचे दर

SCROLL FOR NEXT