

आजच्या डिजिटल युगात कोणतीही माहिती काही सेकंदांत मोबाईलवर उपलब्ध होते. त्यामुळे अनेक जण शरीरात एखादा त्रास जाणवला की सर्वप्रथम Google वर त्याची माहिती शोधतात. कोणता आजार असू शकतो, त्यावर कोणती औषधं घ्यावीत किंवा घरगुती उपाय काय आहेत याचा शोध घेतला जातो. मात्र डॉक्टरांच्या मते, ही सवय अनेकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय.
महाराष्ट्रातील विशेषत: मुंबईतील डॉक्टरांचं म्हणणं आहे की, इंटरनेटवरील माहिती वाचून अनेक रुग्ण स्वतःच आजार ओळखल्याचा समज करून घेतात. त्यामुळे ते डॉक्टरांकडे जाणं टाळतात किंवा उपचार उशिरा सुरू करतात. प्रत्येक व्यक्तीची तब्येत, मेडिकल हिस्ट्री आणि आजाराची तीव्रता वेगळी असते. त्यामुळे इंटरनेटवर मिळणारी माहिती प्रत्येकाला लागू होईलच असं नाही. योग्य वेळी तपासणी आणि उपचार न झाल्यास आजार बळावू शकतो आणि पुढे उपचार अधिक कठीण होण्याची शक्यता वाढते.
सतत थकवा जाणवणं, ताप, डोकेदुखी, सर्दी-खोकला, श्वास घेताना घरघर होणं, घसा दुखणं, छातीत दुखणं, धाप लागणं, पोटदुखी, अॅसिडिटी, उलट्या, जुलाब, अचानक वजन कमी होणं, चक्कर येणं किंवा भूक न लागणं अशी कोणतीही लक्षणं दिसली की, अनेक जण थेट Google वर त्याबाबत माहिती शोधतात. त्यानंतर काही जण स्वतःच औषधं घेण्यास सुरुवात करतात तर काही जण घरगुती उपाय करून पाहतात किंवा त्रास आपोआप कमी होईल, अशी वाट पाहतात. त्यामुळे गंभीर आजार किरकोळ समजण्याची चूक अनेकांकडून होते.
याबाबत अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, मुंबईतील इंटरनल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. छाया वाजा म्हणाल्या, "इंटरनेटवर आरोग्यविषयक माहिती सहज उपलब्ध असल्याने अनेक जण त्यावरच विश्वास ठेवतात. पण ऑनलाइन माहिती ही केवळ सामान्य माहिती म्हणून वापरावी. ती डॉक्टरांच्या सल्ल्याचा पर्याय कधीच ठरू शकत नाही."
त्यांनी सांगितलं की, त्यांच्याकडे येणाऱ्या जवळपास 80 टक्के रुग्णांनी आधी Google वर लक्षणांची माहिती शोधलेली असते. त्यानंतर अनेक जण डॉक्टरांचा सल्ला न घेता मेडिकलमधून मिळणारी (OTC) औषधं घेतात किंवा घरगुती उपाय करतात.
25 ते 55 वर्षे वयोगटातील सुमारे 10 पैकी 8 रुग्ण दर महिन्याला उशिरा उपचारासाठी येतात. कारण इंटरनेट किंवा सोशल मीडियावर वाचलेल्या माहितीमुळे त्यांना आपली लक्षणं गंभीर नसल्याचा गैरसमज झालेला असतो. मात्र तोपर्यंत संसर्गजन्य आजार, हृदयाच्या समस्या, कॅन्सर, मधुमेह, किडनीचे आजार किंवा इतर गंभीर आजार वाढलेले असतात. त्यामुळे उपचार अधिक गुंतागुंतीचे, खर्चिक आणि वेळखाऊ होतात. योग्य वेळी डॉक्टरांकडे गेल्यास आजार सुरुवातीलाच ओळखता येतो आणि कमी गुंतागुंतीत उपचार होऊन रुग्ण लवकर बरा होण्याची शक्यता वाढते.
दरम्यान, डोंबिवलीतील AIMS हॉस्पिटलचे वरिष्ठ फुफ्फुसरोगतज्ज्ञ आणि अतिदक्षता विभागाचे तज्ज्ञ डॉ. संदीप कादियन यांनीही याबाबत माहिती दिलीये. ते म्हणाले, "आजकाल ऑनलाइन माहितीच्या आधारावर स्वतःच आजार ओळखण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. माझ्याकडे येणाऱ्या सुमारे 70 टक्के रुग्णांनी आधी Google वर माहिती शोधलेली असते. त्यापैकी अनेक जण घरगुती उपाय करतात किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमधून औषधं घेतात."
त्यांच्या मते, दर महिन्याला 25 ते 55 वर्षे वयोगटातील 10 पैकी 7 रुग्ण अशाच प्रकारे उशिरा उपचारासाठी येतात. इंटरनेटवर माहिती वाचून त्यांनी स्वतःच उपचार सुरू केलेले असतात. मात्र त्यानंतर लक्षणं अधिक गंभीर झाल्याने अखेर डॉक्टरांकडे यावं लागतं.
डॉ. कादियन यांनी पुढे सांगितलं की, प्रत्येक व्यक्तीची माहिती, जीवनशैली आणि आजाराचा धोका वेगळा असतो. ही माहिती केवळ इंटरनेटवर शोधून समजू शकत नाही. योग्य निदान करण्यासाठी डॉक्टर आवश्यक त्या तपासण्या करतात आणि त्यानंतरच योग्य उपचार सुरू करतात. त्यामुळे इंटरनेटवरील माहितीवर पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.