MNS to contest 125 seats in Mumbai civic elections 2025 : मराठीच्या मुद्द्यावर १८ वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. त्यानंतर राज्यात नव्या युतीची, समीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात आले. एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरेंनी भरसभेत सांगितले होते. पण आता मनसेकडून मुंबईत स्वबळाची तयारी करण्यात येत असल्याचे समोर आले. मनसेकडून २२७ जागांपैकी १२५ जागांची तयारी करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितलेय.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत अनिश्चितता कायम असल्याने मनसेने स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'मुंबईतील एकूण २२७ जागांपैकी १२५ जागांवर मनसेची ताकद असून, याच जागांवर पक्ष निवडणूक लढवणार आहे.' जरी ठाकरे सेनेसोबत युतीच्या चर्चा सुरू असल्या तरी त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. पक्ष संघटनात्मक पातळीवर बैठका घेऊन प्रत्येक प्रभागाचा आढावा घेत आहे. अंतिम निर्णय अध्यक्ष राज ठाकरे घेणार असले तरी, पक्षाने स्वतंत्रपणे लढण्याच्या दृष्टीने आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. दोन्ही नेत्यांकडून तसे संकेतही देण्यात आले होते. पण जागावाटपाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. राज्यातील महापालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात. अशात गाफील राहिल्यास तयारी पूर्ण होणार नाही. त्यामुळेच मनसेकडून उद्धव ठाकरेंशिवाय निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी करण्यात येत आहे. २२७ जागांपैकी १२५ जागांवर मनसेची मुंबईत ताकद आहे. फक्त त्याच जागा लढण्याबाबत मनसेकडून तयारी करण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईत भाजप आणि संघाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढवण्यावर चर्चा झाली. मुंबई महापालिकेच्या निवडणूक मैदानात आक्रमकतेने उतरा. विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवा पण त्यासोबतच हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करा.नरेटिव्हच्या लढाईत गाफिल राहू नका. अजेंड्याचे विषय प्राधान्याने सोडवा आणि जनमानसात पोहोचवा असे थेट निर्देश भाजप आणि संघाच्या संयुक्त बैठकीत पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश, मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांच्यासह भाजप आणि संघाचे महत्त्वपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस आघाडीत न लढता स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या बैठकीत मुंबईच्या निवडणुकीवर चर्चा झाली. त्यामध्ये स्वबळाचा नारा देण्यात आल्याचे समोर आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.