शिवसेना ठाकरे गटाला पुण्यात खिंडार
पुण्यात शिवसेनाचा एकही नगरसेवक शिल्लक राहिला नाही
नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत महायुतीमधील पक्षात केला प्रवेश
महापालिका निवडणुकीपूर्वी पुण्यात शिवसेनेला मोठी गळती
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. पुण्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं. महायुतीने शिवसेना ठाकरे गटाच्या सर्वच नगरसेवकांना गळाला लावलं. एक- एक करत शिवसेनेच्या सर्वच नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. महापालिका निवडणुकीपूर्वी हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
महापालिका निवडणुकीआधीच ठाकरेंची शिवसेना पुणे शहरात शून्यावर आली आहे. शेवटच्या दोन माजी नगरसेवकांनी देखील ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आता २०१७ मध्ये निवडून आलेला एकही नगरसेवक शिल्लक राहिलेला नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर नाना भानगिरे वगळता सर्व नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. मात्र आता एकही नगरसेवक शिल्लक नसल्याने शिंदे यांच्या शिवसेनेलाच शहरातील अस्तित्व टिकून ठेवावे लागणार आहे.
२०१७ मध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे १० नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर यातील ९ नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र, आता गेल्या तीन वर्षांत एक-एक करून शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना 'जय महाराष्ट्र' करत दुसऱ्या पक्षामध्ये उड्या मारल्या आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एकही नगरसेवक उरलेला नाही. 'शिवसेना उबाठा मुक्त पुणे' अशी स्थिती निर्माण झाली आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच येरवडा येथील शिवसैनिकांनी संजय भोसले यांच्या फोटोला चपलीने तुडवलं आणि नाराजी व्यक्त केली. ज्या पक्षाने गटनेतेपद दिलं, ज्या पक्षाने 'स्मार्ट सिटी'सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर विश्वासाने जबाबदारी सोपवली त्याच पक्षाच्या पाठीत सत्तेसाठी खंजीर खुपसणाऱ्या बंडखोरांविरोधात नवी खडकीत शिवसैनिकांचा प्रचंड उद्रेक पाहायला मिळाला. संजय भोसले, अश्विनी भोसले आणि पृथ्वीराज सुतार यांच्या पक्षबदला विरोधात संतप्त शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर जोरदार निदर्शनं केली."गद्दारांचे करायचे काय? खाली मुंडी वर पाय!" अशा घोषणांनी संपूर्ण येरवडा परिसर दणाणून गेला होता.
आंदोलकांनी बंडखोरांच्या प्रतिमांचे दहन करून आपला संताप व्यक्त केला. उप-शहर संघटक संजय वाल्हेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी स्पष्ट इशारा दिला की, सत्तेच्या लालसेपोटी निष्ठा विकणाऱ्यांना जनता कदापि माफ करणार नाही. 'स्मार्ट सिटी'च्या नावाखाली केवळ स्वतःचे हित जोपासणाऱ्या आणि पक्षनिष्ठेशी खेळणाऱ्या या नेत्यांना आता रस्त्यावर उतरून जाब विचारला जाईल, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
बाळा ओसवला, विशाल धनवडे, प्राची अल्हाट, संगिता ठोसर, पल्लवी जावळे, संजय भोसेल, पृथ्वीराज सुतार
नाना भानगिरे
अविनाश साळवे
श्वेता चव्हाण
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.