कर्जत यार्ड आधुनिकीकरणासाठी १ व २ ऑक्टोबर रोजी विशेष ब्लॉक
कर्जत-खोपोली लोकल गाड्यांवर मोठा परिणाम होणार आहे.
चेन्नई, मदुरैसह अनेक एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलले
प्रवाशांनी प्रवास करण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक जाणून प्रवास करावा.
मध्य रेल्वेने कर्जत स्थानकावर यार्ड पुनर्रचना आणि आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारणीचे काम हाती घेतले आहे. यासाठी प्री नॉन-इंटरलॉकिंग कामाची आवश्यकता असल्याने २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये विशेषतः १ ऑक्टोबर आणि २ ऑक्टोबर रोजी रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.
या ब्लॉक दरम्यान १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२० ते संध्याकाळी ५.२० वाजेपर्यंत तर २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत कर्जत परिसरातील गाड्यांची वाहतूक विस्कळीत राहणार आहे. हा ब्लॉक भिवपुरी स्थानक, जांब्रुंग केबिन, ठाकूरवाडी, नागनाथ केबिन ते कर्जत या संपूर्ण विभागात लागू राहणार आहे.
या दोन दिवसांत कर्जत-खोपोली दरम्यान अप आणि डाउन लोकल गाड्यांची सेवा पूर्णपणे ठप्प राहणार आहे. त्यामुळे खोपोलीकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. तसेच कर्जत-सीएसएमटी लोकल गाड्या काही वेळा नेरळ किंवा अंबरनाथ येथेच थांबवल्या जाणार आहेत. अनेक गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन होणार असून, काही गाड्या नेरळ, अंबरनाथ किंवा ठाणे येथूनच सुरू होतील.
लोकल गाड्यांबरोबरच मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही मोठा बदल करण्यात आला आहे. काही गाड्या जवळपास दीड ते दोन तास विविध स्थानकांवर थांबवाव्या लागणार आहेत. जोधपूर-हडपसर एक्सप्रेस, सीएसएमटी-भुवनेश्वर एक्सप्रेस, सीएसएमटी-हैदराबाद एक्सप्रेस, बिकानेर-यशवंतपूर एक्सप्रेस, तसेच पनवेल-नांदेड एक्सप्रेस यांसारख्या गाड्या भिवंडी, भिवपुरी रोड, नेरळ, वांगणी आणि चौक येथे नियमन करण्यात येणार आहेत. यामुळे काही गाड्या १५ ते २० मिनिटांनी उशिराने धावतील. तसेच चेन्नई एक्सप्रेस आणि मदुरै एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून, त्या नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुटणार आहेत.
दुसऱ्या दिवशी म्हणजे २ ऑक्टोबरलाही असाच प्रकार होणार असून, काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नेरळ, अंबरनाथ आणि ठाणे येथून गाड्यांचे शॉर्ट ओरिजिनेशन व टर्मिनेशन केले जाणार आहे. त्यामुळे दिवसभर प्रवाशांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कर्जत यार्डचे आधुनिकीकरण ही एक मोठी योजना आहे. जुन्या पद्धतीच्या इंटरलॉकिंग सिस्टीमऐवजी आधुनिक प्रणाली बसवली जात आहे. या कामामुळे भविष्यात रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत, सुरक्षित आणि वेळेवर होईल. ट्रेनची गती वाढेल आणि अपघाताचा धोका कमी होईल. कर्जत हे एक महत्त्वाचे जंक्शन असून, पुणे, खोपोली, लोणावळा आणि मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी हे केंद्रबिंदूचे स्थानक आहे. त्यामुळे या ठिकाणी होणारे बदल दीर्घकालीन दृष्टिकोनातून फायदेशीर ठरणार आहेत.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, या दोन दिवसांमध्ये गाड्यांच्या वेळापत्रकात होणाऱ्या बदलांची नोंद घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे आणि हे देखभाल मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधा उभारणीसाठी अत्यावश्यक असल्याचे सांगितले आहे. दीर्घकाळासाठी प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळावा यासाठी ही कामे केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.