भारताने एशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला
सामना जिंकल्यानंतर ट्रॉफी स्विकारण्यास टीम इंडियाचा एसीसी अध्यक्षांकडून नकार
आयसीसीच्या नियमानुसार कर्णधाराने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देणे हे आचारसंहितेअंतर्गत येऊ शकते.
वादग्रस्त घटनेमुळे आयसीसीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
दुबईच्या मैदानावर भारताने रविवारी रात्री पाकिस्तानला धूळ चारली. पाकिस्तानने टीम इंडियाला १४७ धावांचं आव्हान दिलं. मात्र टीम इंडियाच्या फलंदाजी दरम्यान खराब सुरुवात झाल्याने पाकिस्तानी खेळाडूंना आत्मविश्वास आला. ते टीम इंडियाला हरवण्याची स्वप्ने पाहू लागले मात्र टीम इंडियाचा खेळाडू तिलक वर्माने पाकिस्तानच्या स्वप्नांचा चक्काचूर केला. या सामन्यानंतर भारताने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र ही ट्रॉफी आता टीम इंडियाला परत मिळणार का ? हा प्रश्न प्रत्येक भारतीयाला भेडसावत आहे.
एशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद अनेकदा उफाळून आला होता. हात मिळवण्यास नकार देणं, चिथावणीखोर इशारे करणं अशा अनेक घटना या स्पर्धेदरम्यान घडल्या. मात्र अंतिम सामन्यानंतरचा ट्रॉफी समारंभ हा वादग्रस्त ठरला. ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार एसीसीचे अध्यक्ष नकवी हे विजेत्यांना ट्रॉफी प्रदान करणार होते. परंतु, टीम इंडियाने त्यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला.
याचं मुख्य कारण म्हणजे नकवी यांनी एसीसीचे अध्यक्ष म्हणून आपली भूमिका अनेकदा पक्षपातीपणे निभावली होती आणि पाकिस्तान क्रिकेटलाच प्राधान्य दिलं होतं. मात्र आता टीम इंडियाने विजेता चषक न घेतल्याने आयसीसीच्या नियमानुसार कर्णधाराने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देणे हे आचारसंहितेअंतर्गत येऊ शकते. परंतु याबाबत कोणतेही विशिष्ट नियम नाहीत. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला त्याने ट्रॉफी का स्वीकारली नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल आणि त्यानंतर एसीसी किंवा आयसीसी कोणत्याही कारवाईचा निर्णय घेईल.
दरम्यान संपूर्ण वादावर प्रतिक्रिया देताना सूर्यकुमार म्हणाला, “हा चषक आम्हाला मिळाला नाही, याचं दुःख नाही. जगाला माहिती आहे की एशिया कप २०२५ कोण जिंकलं. आमचं नाव मोठ्या स्क्रीनवर लिहिलं गेलं. Asia Cup 2025 Champions: India. त्यापेक्षा मोठा सन्मान कोणता?”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.