बदलापूरच्या आंबेशिव गावात पुन्हा बिबट्याची दहशत
बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचा स्थानिकांचा दावा
भरदुपारी कुत्र्याची शिकार केल्याच्या दाव्यानंतर परिसरात दहशत
आंबेशिव गावात दोन बिबटे आल्याची भीती
मयुरेश कडव, बदलापूर | साम टीव्ही
मानवी वस्तीत घुसून माणसांवर बिबटे हल्ले करत असल्याचा मुद्दा सध्या अख्ख्या महाराष्ट्रभर गाजतोय. अगदी नागपूरच्या विधीमंडळ अधिवेशनातही बिबट्यांच्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित झालाय. यावरून राजकारण तापलं आहे. बिबट्यांचा मुद्दा ऐरणीवर असतानाच मुंबईपासून जवळ असलेल्या बदलापूरच्या आंबेशिव गावात बिबट्याची दहशत पसरलीय. या गावाच्या हद्दीत एक नव्हे तर दोन-दोन बिबटे असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. बिबट्यानं भरदुपारीच कुत्र्याची शिकार केल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
बदलापूरपासून जवळच आंबेशिव गाव आहे. या गावात बिबट्याची प्रचंड दहशत आहे. एका बिबट्यानं तर आज, शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास एका कुत्र्याची शिकार केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. तर इथे एक नव्हे दोन बिबटे असल्याचही सांगण्यात येत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून आंबेशिव गावात स्थानिकांना बिबट्या दिसल्यामुळे इथले ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
बिबट्या असल्याचा दावा स्थानिकांनी केल्यानंतर याबाबतची माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाकडून या भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. तसेच तातडीने पावले उचलून उपायोजनाही सुरू केल्या होत्या. मात्र बिबट्याला पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आलेले नाही. त्याचवेळी एका घराच्या आवारात बिबट्याने कोंबड्यांवर हल्ला केल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. त्यानंतर आज रस्त्यावर रक्ताचा सडा दिसून आला. बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे आंबेशिव तसेच आसपासच्या गावांतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
सचिन कदम, अलिबाग, साम टीव्ही
अलिबाग तालुक्यातही बिबट्याची दहशत कायम आहे. नागावनंतर आज आक्षी, साखर गावात बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोघांवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. चहाच्या हॉटेलमध्ये बिबट्या घुसला. बिबट्याच्या हल्ल्यात दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. वनविभागाचे पथक, पोलीस गावात पोहोचले. बिबट्याचा शोध सुरू केला आहे. दोनच दिवसांपूर्वी नागाव येथे बिबट्या दिसून आला होता. तेथे बिबट्याच्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.