विधानसभा निवडणुकीच्या महासंग्रामाला सुरुवात झाली असून सर्वच पक्षांकडून उमेदवार जाहीर झाले आहेत. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना सर्वच पक्षातील उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. पुण्यातील वडगांव शेरी मतदारसंघातून एकूण 56 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बापूसाहेब पठारे हे उमेदवार असताना वडगांव शेरी मतदारसंघातून अजून एका बापू बबन पठारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने वडगांव शेरी मतदारसंघात दोन बापू पठारे झालेत. त्यामुळे अपक्ष उमेदवार बापू बबन पठारे यांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
पुणे शहरातील वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार बापू पठारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काल अहिल्यानगर जिल्ह्यातील मांडवगन गावातील बापू बबन पठारे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अपक्ष उमेदवार बापू पठारे यांच्या उमेदवारी अर्जावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्षेप घेत या उमेदवाराने कोणतीही माहिती दिली नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
याबाबत सुरेंद्र पठारे यांनी सांगितले की, कालच आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या नातेवाईकांकडून एक डमी उमेदवाराला श्रीगोंदा येथून आणलं आणि त्याचा उमेदवारी अर्ज भरला आहे. आज अर्जाची छाननी असून आम्ही त्या अपक्ष उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे.
या उमेदवाराच्या अर्जात अनेक त्रुटी आहेत. तसेच निवडणूक अधिकारी यांच्याकडून देखील उमेदवाराच्या अर्जाची एफिडेविड सार्वजनिक करण्यात आलेली नाही. या अपक्ष उमेदवाराने त्याच्यावर असलेल्या कर्जाची अर्जात माहिती दिलेली नाही. तसेच बँकेतील पैसे देखील नमूद नाही म्हणून आम्ही आक्षेप घेतला आहे. असं यावेळी सुरेंद्र पठारे यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, आमचे प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारांना आताच त्यांचा पराभव दिसल्याने त्यांनी असा डमी उमेदवार उभा केला असल्याचं यावेळी सुरेंद्र पठारे यांनी सांगितलं आहे.
यावर निवडणूक अधिकारी सचिन बारवकर म्हणाले की, आज छाननीला सुरवात झाली असून आत्तापर्यंत 23 उमेदवारांची छाननी झाली असून 24 वा उमेदवार बापू बबन पठारे यांच्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्या अर्जाची छाननी झाली आहे आणि त्यांचा अर्ज वैद्य ठरविण्यात आला आहे.
बापू बबन पठारे यांचा उमेदवारी अर्ज आज वैद्य ठरविण्यात आल्याने आत्ता वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापू पठारे आणि अपक्ष उमेदवार बापू पठारे हे दोन्ही नाव समान असल्याने मतदारांमध्ये गोंधळ पाहायला मिळणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.