मुसळधार पावसामुळे आमणोली आणि कानसळ गावांमध्ये पूरस्थिती
आमणोली येथे अडकलेल्या सहा महिन्यांच्या बाळासह पाच जणांची थरारक सुटका
अंबा नदीच्या पुरात अडकलेल्या 12 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले
प्रयत्नांमुळे एकूण 17 नागरिकांचे प्राण वाचले
अमित गवळे, रायगड
सुधागड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून, या संकटात आमणोली आणि कानसळ गावांमध्ये अडकलेल्या एकूण 17 नागरिकांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक, आपदा मित्र आणि स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
सोमवारी (ता. 6) पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास आमणोली गावात अचानक पूर आला. पावसाचा जोर वाढत असताना पुराचे पाणी वेगाने गावात शिरले आणि एका शेतघराला वेढा घातला. यामध्ये संदीप, त्यांची पत्नी रीमा, त्यांचा अवघा सहा महिन्यांचा मुलगा अथर्व आणि दोन ज्येष्ठ नागरिक असे पाच जण घराच्या छतावर अडकून पडले होते. अंधार, सतत वाढणारी पाण्याची पातळी आणि मदतीची प्रतीक्षा यामुळे या कुटुंबासमोर जीवघेणा प्रसंग निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांनी धाडसाने पुढाकार घेत आपत्ती व्यवस्थापन पथकासोबत बचाव मोहिमेत सहभाग घेतला. आपदा मित्र अमित निंबाळकर, नंदकिशोर शिंदे आणि ट्रेकर दर्शन तळेकर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पूरग्रस्तांपर्यंत पोहोचत सर्व पाच जणांना सुरक्षितस्थळी हलवले.
दरम्यान, कानसळ गावाजवळील अंबा नदीला आलेल्या पुरामुळे आणखी एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. नदीकाठी काम करणारे 12 कामगार पुराच्या पाण्यात अडकले होते. माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक कार्यकर्ते शशी धानिवले यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रतिकूल परिस्थितीतही संयम आणि नियोजन राखत सर्व कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली. या दोन्ही घटनांमध्ये मिळून 17 नागरिकांचे प्राण वाचवण्यात यश आले. आमणोलीतील चंद्रकांत दिने, प्रकाश काशिराम दिने, नथुराम अमृस्कर आणि गणेश तुकाराम दिने यांनीही बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
संकटाच्या काळात प्रशासनाची तत्परता, आपदा मित्रांचे धाडस आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे मोठी दुर्घटना टळली. बचावलेल्या नागरिकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासन व बचाव पथकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, तहसीलदार उत्तम कुंभार यांनीही या मोहिमेत योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.