व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी साताऱ्यातील एका शाळेत भयंकर घटना घडली
शाळेतच शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रपोज केला
विद्यार्थिनीचा हात पकडून शिक्षकाने प्रेमाची कबुली दिल्याचा आरोप
पीडित मुलीच्या तक्रारीनंतर कराड पोलिसांनी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला
साताऱ्यामध्ये एका शिक्षकाने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शाळेतील विद्यार्थिनीला प्रपोज केल्याचा धक्कादाक प्रकार समोर आला. शाळेमध्येच विद्यार्थिनीचा हात पकडून या शिक्षकाने तिला प्रपोज केला. मलकापूर शहरातील एका शाळेत ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी विद्यार्थिनी आणि तिच्या पालकाने पोलिस ठाण्यात धाव घेत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कराड पोलिसांनी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील मलकापूर शहरात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ही घटना घडली असून याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला एका शिक्षकाने शाळेतच प्रपोज करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मलकापूरमधील या शाळेत खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, मलकापूर शहरातील एका शाळेत पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलवले होते. भीतीपोटी मुलगी तीन मैत्रिणींना सोबत घेऊन वर्गाबाहेर गेली. मात्र शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला थांबण्यास सांगितले. त्यानंतर हा शिक्षक या विद्यार्थिनीला म्हणाला की,'मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर ऑनलाईन का असतेस तू? मी तुझ्यावर प्रेम करतो.'
या शिक्षकाने शाळेमध्येच विद्यार्थिनीचा हात पकडून तिला प्रपोज करण्याचा प्रयत्न केला. शिक्षकाचे हे बोलणे ऐकून विद्यार्थिनी प्रचंड घाबरली. तिने शिक्षकाचा हात झटकला आणि वर्गामध्ये धाव घेतली. त्यानंतर या मुलीने घडलेली घटना आपल्या मैत्रिणी आणि कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. रविवारी कराड शहर पोलिस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.