नाशिकमधील गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) आयोजित ‘समर युथ समीट- २०२५’मध्ये तरुणाईला नवीन दिशा मिळाली आहे. 31 मे आणि 1 जून या दोन दिवसांच्या या समिटमध्ये तरुणांचे नेतृत्व, भविष्यातील आव्हाने, एआय तंत्रज्ञान, मानसिक आरोग्य, करीअर अशा विविध मुद्यांवर मंथन झालं. विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनाची शिदोरी तरुणाईला त्यांच्या वाटचालीत नक्कीच मदतीची ठरणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई विभागातील सुमारे साडेचारशे विद्यार्थी परीषदेसाठी आले होते.
नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा या आदिवासी भागात शिकणारे काही महाविद्यालयीन विद्यार्थीही या परीषदेसाठी आवर्जून आले होते. या दोन दिवसांमध्ये आम्हाला खूप काही गवसलं..आमच्या स्वप्नांना आता निश्चियाचं बळ मिळालंय. करीअरमधली दिशा स्पष्ट होण्यास मदत झाल्याचं अनेक विद्यार्थ्यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केली. तर काही मुला, मुलींनी आमच्यातील नेतृत्व गुणांना 'यिन'मध्ये पैलू पडले, नेतृत्व गुण विकसित करता आले, अशी भावना व्यक्त केली.
सकाळ माध्यम समूहाचे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क अर्थात ‘यिन’ हे युवकांना एकत्र करणारे मोठे व्यासपीठ आहे. ‘यिन’ हे राजकारण, समाजकारण करताना कसे वागावे, हे शिकवणारे व एक संस्कार देणारे, नेतृत्व विकसित करणारे विद्यापीठ आहे. कारण इथही निवडणूक होते. मंत्रिमंडळ तयार होते. खाते वाटप होत. झेडपी अध्यक्षही असतात.
जिल्हा कार्याध्यक्ष, राज्य संपर्क प्रमुख तथा स्त्री प्रतिष्ठान समिती अशीही पदे असतात. ‘यिन’मध्ये असलेले ‘समर युथ समीट’, कला महोत्सव असे वेगवेगळे उपक्रमांमुळे एक वेगळी संधी आणि कला गुणांना वाव मिळतो आहे. युवकांना संघटित करून विधायक काम करता येते हे 'यिन'ने दाखवून दिलं आहे एवढं निश्चित.
‘सकाळ’ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या संकल्पनेतून ‘यिन’ नावारूपाला आले. पाच हजारांहून अधिक महाविद्यालयांतील पंचवीस लाखांपेक्षा जास्त महाविद्यालयीन विद्यार्थी या व्यासपीठाशी जोडले गेले आहेत. विविध उपक्रमांमध्ये ते सहभागी होत असतात. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व, नेतृत्व विकसत होतं. विविध कौशल्ये आत्मसात करण्याची संधी विद्यार्थ्यांना यातून उपलब्ध होत असते.
विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी परीषदेचे उदघाटन केलं. यावेळी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, स्पेक्ट्रम अकॅडमीचे संचालक सुनील पाटील, ग्रोवर्थ कंपनीचे अध्यक्ष संदीप घाडगे, ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर, महाव्यवस्थापक संजय पाटील आदी उपस्थित होते. आयटी एक्सपर्ट आणि प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले, मानसोपचार तज्ञ डॉ. उमेश नागापूरकर, नाशिकच्या आर्टिलरी सेंटरचे कर्नल राजीव सिंग यांनी महाविद्यालयीन तरुणांना विचारांची एक दिशा दिली. तर समिटच्या समारोपाच्या प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि सकाळ माध्यम समुहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं.
तरुणाईचे नेटवर्क तयार करा -गेडाम
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाने जीवनमान बदलत आहे. त्यामुळे करिअरचा विचार करताना भविष्याचा वेध घेणे महत्त्वाचे ठरते. पुढील काही वर्षांत कुठल्या क्षेत्रात वाव असेल, याचा अंदाज घेत काळानुरूप कौशल्ये आत्मसात करत यशस्वी करिअर घडवा, असा सल्ला विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी येथे दिला.
डॉ. गेडाम म्हणाले, की ‘विकसित भारत’चा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी युवा पिढीवर आहे. मग त्यांनी राजकारण, प्रशासन या क्षेत्रातून योगदान देण्याचा मार्ग निवडावा किंवा उद्योजकता, व्यवसायाच्या माध्यमातून हातभार लावावा. करिअर घडविण्यासाठी ‘यिन’ व्यासपीठाचा प्रभावी वापर करून युवकांचे नेटवर्क तयार करावे. त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी व समाजाच्या विकासासाठी उपयोग करावा.पायाभूत सुविधांचा विकास होताना समृद्धी महामार्ग, सुरत-चेन्नई महामार्ग यांसह पालघरमधील वाढवण बंदरासोबत नाशिक थेट जोडले गेले आहे. यामुळे नाशिकमध्ये लॉजिस्टिक्स, टुरिझम या क्षेत्रांमध्ये भविष्यात प्रचंड वाव आहे. कृषिप्रक्रिया उद्योगातही अमाप संधी उपलब्ध आहेत. या पर्यायांचे आकलन करताना कौशल्ये आत्मसात करण्यावर भर देण्याचे आवाहन डॉ. गेडाम यांनी केले.
आता आपली स्पर्धा आपले गाव, राज्य किंवा देशापुरता मर्यादित राहिलेली नाही. आपली स्पर्धा जगाशी आहे. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आपले नाणे खणखणीत असणे गरजेचे आहे, असे मत अॅड नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, की युवकांना योग्य दिशा दाखविण्यात ‘यिन’ व्यासपीठाची उपयुक्त भूमिका आहे. शॅडो कॅबिनेटपासून इतर विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना वाव मिळत आहे. समर युथ समीटमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी देखील प्राप्त ज्ञानाचा त्यांचा व्यक्तिगत व सामाजिक आयुष्यात अवलंब करताना परिवर्तन घडविण्यासाठी आग्रही राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
काळानुरूप बदल अंगीकारावा : पाटील
कोरोनापूर्वी सौंदर्य वाढविण्याची जाहिरात करणारे साबण, महामारीनंतर विषाणू नष्ट करण्याची जाहिरात करू लागले. या कंपन्यांनी काळानुरूप बदलत्या गरजा लक्षात घेत धोरणात्मक बदल केला. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यानेही बदलत्या काळासोबत आवश्यक बदल अंगीकारावा, असे आवाहन स्पेक्ट्रम ऍकॅडमीचे संचालक सुनील पाटील यांनी केले. करिअरच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्यार्थ्यांचे समर युथ समीटमध्ये सहभागी होताना प्रगलभता वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रोवर्थ कंपनीचे अध्यक्ष संदीप घाडगे म्हणाले, की वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. या व्यक्तींच्या ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांनी स्वताचा विकास साधण्यासाठी करावा. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला कार्यक्रमातून नवी शिकवण मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार - भुसे
सद्गुरु वामनराव पै यांच्या 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या वाक्याचा दाखला देत भुसे यांनी तरुणांसमोरची आव्हाने स्पष्ट केली. स्वत:मधील सामर्थ्यांची जाणीव करुन दिली. यावेळी शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण क्षेत्रातील बदलत्या घटनांचाही वेध घेतला. सरकार काय नवीन उपक्रम राबवतंय याचीही माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण व्हावी, ‘नेशन फर्स्ट’ हा विचार रुजविण्याच्या उद्देशाने इयत्ता पहिलीपासूनच सैनिकी शिक्षणाचे प्राथमिक स्तरावरील प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केलीय. माजी सैनिक, क्रीडाशिक्षक, एनसीसी आणि स्काउट-गाइडचे शिक्षक हे विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे देतील, अशी घोषणा ‘समर युथ समिट २०२५’च्या समारोपप्रसंगी भुसेंनी केली.
नवीन तंत्रज्ञानाचा फायदा, एआयमुळे झालेले बदल याचा मागोवा सकाळ माध्यम समुहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी घेतला. आधुनीक तंत्रज्ञान कसं फायदेशीर आहे असं सांगून आपली ध्येय, उद्दीष्ट गाठण्यासाठी कसे प्रयत्न असावेत यावर खरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
सध्याच्या धावत्या जीवनशैलीत आणि जीवघेण्या स्पर्धेत आरोग्य जपणं महत्वाच आहे. त्यातही मानसिक आरोग्य सुदृढ राहिला थोड्याशा संघर्षानं कोलमडणार नाही. याची दक्षता घेणे गरजेचे आहे. मानसोपचार तज्ञ डॉ. उमेश नागापूरकर यांनी मानसिक आणि भावनिक आरोग्यावर तरुणांना मार्गदर्शन केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.