मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीटीकरणासह विविध पूल आणि सेवा रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना त्रास होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक नियोजनासह सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने युद्धपातळीवर काम पूर्ण करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
ठेकेदाराकडून गतीने काम होत नसल्यास त्याला काळ्या यादीत टाकून सक्षम ठेकेदाराला काम देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा घेतला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नाशिक-मुंबई महामार्गाच्या दर्जा उन्नतीचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना मुंबईला येण्याजाण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गाच्या सुधारणेचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले पाहिजे. या मार्गावर गर्दीच्या वेळी १ लाख ७० हजार पॅसेंजर कार युनिट (PCU) एवढी वाहने असतात. त्यामुळे काम करताना अडथळे येतात. (Latest Marathi News)
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाशी समन्वय करुन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला रस्ते कामाच्या गतिमान कार्यवाहीत आवश्यक सहकार्य करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
सध्याचा कालावधी रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी अनुकूल असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पावसाळ्यामध्ये रस्तेबांधकामात अडथळे येतात. ‘एमएसआरडीसी’ने रस्त्यावरील खड्डयांची तातडीने दुरुस्ती करावी, हे काम दर्जात्मक होईल याकडे लक्ष द्यावे. काँक्रीटीकरणाच्या कामावेळी वाहतूक व्यवस्था चोख ठेवल्यास अडचण येणार नाही. यादृष्टीने आवश्यक मनुष्यबळ (वॉर्डन), बॅरिकेट्स यांची उपलब्धता करण्यात यावी. जड वाहनांना वेळेची मर्यादा घालण्यात यावी. अरुंद ठिकाणांचे मॅपिंग करावे, अशा सूचनाही अजित पवार यांनी बैठकीत दिल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.