राज्यात कोसळलेल्या अवकाळी पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या अवकृपेने बळीराजाच्या अश्रूंचा बांध फुटला असून हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यात एकीकडे अवकाळी पावसाचा हाहाकार पाहायला मिळत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणामध्ये प्रचार करताना दिसत आहेत. यावरुनच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
"अवेळी पावसाचा सरकारचा अंदाज चुकला का? असा प्रश्न पडतोय. हल्ली सरकारचे सर्वच अंदाज चुकत आहेत. अवकाळी पावसामुळे 78 हजार 776 हेक्टरचे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात द्राक्ष पिकाचे नुकसान झालेय. तसेच धान्य उत्पादक शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान झाले असताना सरकार मात्र तेलंगणा दौऱ्यावर प्रचारामध्ये व्यस्त आहेत.." अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
तसेच "सरकारने वेळीच उपाययोजना न केल्याने 1 हजार मंडळ वंचित राहणार आहेत. सरकारकडून पंचनामेच झाले नाहीत तर मदत कधी देणार? शेतकऱ्यांकडे कोण बघणार, त्यांचा वाली कोण?" असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. "केंद्र सरकारची मदत मिळेल आम्ही ते लोकांना देऊ असे सांगत सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोपही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी अद्यापही शेतकऱ्यांना पीकविमा न मिळाल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. "पीक विमा कंपन्यांना चाबकाचे फटके दिले पाहिजेत. काही शेतकरी आपले अवयव विकन्यासाठी मुंबईत येत आहेत पीक विमा कंपन्यांवर सरकारचा वाटा किती आहे आणि सरकारला किती वाटा मिळतोय हे आता आम्हाला सांगावे लागेल.. "असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.
"सरकारच्या लोकांमध्ये इतकी मुजोरी येथे कुठून? सरकारला आता जनता विटली आहे. सरकारला बदलल्याशिवाय पर्याय नाही अशी भावना आता सर्वसामान्य शेतकऱ्यांची झालेली आहे," असेही विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.