सागर निकवाडे
नंदुरबार : खानदेशात आजही आपली पारंपारिक संस्कृती टिकून आहे. अक्षय तृतीया अर्थात आखाजीला खानदेशात मोठा उत्साह पाहण्यास मिळतो. ग्रामीण भागात खापरावरची पुरणपोळी घागर भरताना पारंपारिक गाणी आणि सासुरवासिनी माहेराला आल्यावर झोक्यावरची गाणी हे आखाजीला पाहायला मिळेल ते फक्त खानदेशातच.
धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात आजही आखाजीच्या सणाचा उत्साह भरभरून दिसून येतो. ग्रामीण भागातील संस्कृती आजही टिकून आहे. ग्रामीण भागातील सासुरवासिनी दिवाळीनंतर आखाजीला माहेरी येत असतात. मुलांना शाळेच्या सुट्ट्या. तसेच सर्व मैत्रिणी अक्षय तृतीयाच्या सुट्ट्यांमध्ये एकत्र आल्यावर गावातील झाडांना मोठमोठे झोके बांधून झोक्यावरचे गाणे म्हणत असतात. या गाण्यांचे आणि ओव्याच्या माध्यमातून सासुरवासिनीला होणारा त्रास आणि माहेराचा गोडवा गायला जातो. आजही अहिराणी भाषेतील या गाण्यांची लोकप्रियता आणि सुमधुर भाषा अनेकांना भुरळ घालत असते.
घागर भरण्याची खास परंपरा
अक्षय तृतीयेचे दिवशी घागर भरली जाते. अर्थात आपल्या पूर्वजांना आठवून या मुहूर्तावर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. यावेळी घागर भरतानाही महिला पारंपारिक ओव्या गात असतात. आजही आपली संस्कृती जोपासताना आम्हाला अभिमान असल्याचं गाव खेड्यातील महिला सांगतात. तर या दिवशी अक्षय तृतीयाचा जेवणाचा मेनूही खास असतो. खापरावरची पुरणाची पोळी, आमरस, सार- भात, कुरडई- पापड यास विविध पंचपकवान तयार करण्याची लगबग पहाटेपासूनच ग्रामीण भागात दिसून येत असते.
आजच्या आधुनिक युगात धावपळीच्या काळात आपण आपली पारंपारिक संस्कृती शहरी भागात विसरत चाललो असलो. तरी ग्रामीण भागात आजही आपली प्राचीन संस्कृती टिकून आहे. आपल्या येणाऱ्या पिढीला या संस्कृतीची ओळख करून द्यायची असेल तर आपण सण उत्सवाच्या काळात आपल्या गावाकडे गेलेच पाहिजे; असे नंदुरबारच्या ग्रामीण भागातील महिला आवर्जून सांगतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.