हिमायतनगरमधील नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची आत्महत्या
एन. टी. जाधव यांनी गळफास घेत संपवलं आयुष्य
चिंचेच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत
नांदेडच्या हिमायतनगर शहरातील नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. एन. टी. जाधव असं या आत्महत्या केलेल्या संचालकाचे नाव होते. कोचिंग क्लासेसच्या परिसरातील चिंचेच्या झाडाला एन.टी. जाधव यांनी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. जाधव यांच्या आत्महत्येनंतर हिमायतनगर शहरात शोककळा पसरली. या घटनेमुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना धक्का बसला. हिमायतनगर पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगर शहरातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले नामांकित खासगी कोचिंग क्लासेसचे संचालक एन.टी. जाधव यांनी मध्यरात्री ३.३० वाजताच्या सुमारास टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी कोचिंग क्लासेसच्या परिसरात असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेत आयुष्य संपवलं.
आज सकाळच्या सुमारास काही नागरिकांना क्लासेसच्या परिसरातील चिंचेच्या झाडाला जाधव सर गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. याची माहिती तात्काळ हिमायतनगर पोलिस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला.
या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक, माजी विद्यार्थी, पालक आणि परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींनी घटनास्थळी गर्दी केली. एन. टी. जाधव सर हे अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा तसेच शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविले होते. शांत, संयमी आणि विद्यार्थ्यांप्रती आपुलकीची भावना जपणारे शिक्षक अशी त्यांची ओळख होती. त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. त्यांनी आत्महत्या का केली या मागचे कारण समजू शकले नाही.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी भूखंड व्यवहाराशी संबंधित वाद असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांच्या शाळेची मान्यता रद्द झाल्यामुळे ते मानसिक तणावात असल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र या सर्व बाबींना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येचे खरे कारण शोधण्यासाठी सर्व शक्य त्या अंगांनी तपास सुरू करण्यात आला आहे. मयताच्या कुटुंबीयांचे जबाब, जवळील व्यक्तींची चौकशी, मोबाईल कॉल रेकॉर्ड, तसेच इतर संबंधित बाबींची पडताळणी केली जात आहे.
शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील निष्कर्षानंतर एन. टी जाधव सरांच्या मृत्यूमागील कारण स्पष्ट होईल. हिमायतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेने हिमायतनगर शहरातील शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला असून सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.