संदीप भोसले, साम टीव्ही
मराठा आरक्षणाची सातत्याने मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. मराठा आंदोलनात फुट पाडण्यासाठी सरकार एखादा डाव आखू शकतं. त्यामुळे सावध राहा, जाळपोळ तसेच उद्रेक होऊ देऊ नका, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
येत्या १४ ऑक्टोंबर रोजी जालन्यातील अंतरवली सराटी येथे मराठा समाजाची संवाद सभा होणार आहे. या सभेची पूर्वतयारी म्हणून राज्याच्या कानाकोपर्यात सकल मराठा समाजाला निमंत्रित करण्यासाठी मनोज जरांगे पाटील विविध ठिकाणी सभा घेत आहेत. (Latest Marathi News)
त्याचाच एक भाग म्हणून जरांगे पाटील यांनी लातूर जिल्ह्यातील (Latur News) अहमदपूर तालुक्यात मंगळवारी जंगी सभा घेतली. या सभेला हजारो मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाने ४० वर्ष आरक्षणाविना घातले आहेत. त्यामुळे मी सरकारला आरक्षण देण्यासाठी ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. कोर्टात टिकणारं आरक्षण पाहिजे म्हणून हा वेळ देण्यात आला आहे.
आपण वेळ दिला नसता, तर मराठा समाजावर (Maratha Reservation) खापर फुटले असते. मी उपोषण करत असताना अनेक मातब्बर नेते माझ्याकडे आले, त्यांनी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देतो, असं म्हणत मला उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र, त्यानंतर ते आलेच नाही, असा टोलाही मनोज जरांगे यांनी सरकारमधील मंत्र्यांना लगावला आहे.
सर्व पक्षांना विनंती करतो, सगळे एक व्हा , मराठ्यांना तसेच मराठा समाजाला आरक्षण द्या. मी कोणत्या नेत्यासोबत चर्चा केली, कुणी काय आश्वासन दिलं, हे माझ्या लक्षात राहत नाही. रात्रीतून मंत्री बदलतात. यांचे मतभेद जुळत नसताना जुळवून घेतात. त्यामुळे आपल्यातील मतभेद दूर ठेवा, असं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.
दरम्यान, मराठा आंदोलनात फुट पाडण्यासाठी सरकार एखादा डाव करण्याची शक्यता आहे. आपल्यात गट पाडू शकतं. त्यामुळे सावध राहा, असा खळबळजनक दावा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आपल्याला शांततेत आंदोलन करायचं आहे. जाळपोळ उद्रेक होऊ देऊ नका, असं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.