गिरीष कांबळे, साम टीव्ही
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून उमेदवारांची देखील चाचपणी केली जात आहे. मुंबईतील विविध लोकसभा मतदारसंघाचा पक्षांकडून आढावा घेतला जातोय. एकीकडे भाजप आणि शिंदे गटात जागावाटपावरुन चर्चा सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी लोकसभेसाठी मोठा प्लान आखला आहे.
शिंदे-गटासह भाजपला लोकसभेत पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी उद्धव ठाकरे आज उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. या दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बैठकीसाठी बोलण्यात आलं आहे. (Latest Marathi News)
या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीत भाजपचे खासदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे आज मातोश्रीवरील बैठकीत या दोन्ही जागा आपल्याकडे कशा येतील, याबाबत ठाकरे गटाकडून प्लान केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गट (Uddhav Thackeray) मुंबईतील ६ पैकी ४ जागा लढण्यासाठी आग्रही आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई या चार जागांवर ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मविआमध्ये ठाकरे गटाने मुंबईच्या चार जागांवर दावा केला आहे.
मुंबईत सहापैकी ४ जागा ठाकरे गट, तर प्रत्येकी १ जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याची ठाकरे गटाच्या नेत्यांची भूमिका आहे. याशिवाय ठाणे, कल्याण-डोंबिवली, पालघर आणि भिवंडीसाठी येथील लोकसभा जागेसाठी ठाकरे गटाने विशेष आग्रह धरला आहे.
ठाण्यात ठाकरे गटाकडे राजन विचारे नावाचा हुकुमी एक्का आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना या जागेवर विजय मिळवणं कठीण जाईल, असं भाजपच्या नेत्याचं म्हणणं आहे. त्यामुळे ही जागा शिंदे गटाला (Eknath Shinde) भाजपला सोडावी, असा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आग्रह आहे. जर एकनाथ शिंदे यांनी आग्रह धरुन ही जागा आपल्याकडे घेतलीच, तर भाजपच्या आमदारांमध्ये असलेल्या नाराजीमुळे ती धोक्यात येऊ शकते, असंही जाणकारांचं म्हणणं आहे.
त्यामुळे ठाण्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दुसरीकडे उत्तर मुंबईमध्ये लोकसभा मतदारसंघात सध्या गोपाल शेट्टी, तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे मनोज कोटक हे खासदार आहेत. त्यामुळे मुंबईतील या दोन लोकसभा मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विशेष लक्ष असणार आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अरविंद सावंत यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. तर दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे हे शिंदे गटात गेल्याने त्यांना पराभूत करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेसाठी विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाने त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.