मनोज जरांगे मुंबई आंदोलनाबाबत मोठी घोषणा
लाठीचार्ज झाला तर सरकार पडेल
मनोज जरांगे यांचा सरकारला गंभीर इशारा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे उद्या मुंबईकडे रवाना होणार
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज मोठी घोषणा केली. प्रकृती खालावली असताना देखील मनोज जरांगे पाटील हे मुंबईला येण्यावर ठाम आहेत. उद्या दुपारी १ वाजता ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधत सरकारवर गंभीर आरोप केले. 'मेलो तर हटणार नाही उद्या दुपारी १०० टक्के मुंबईकडे जाणार म्हणजे जाणार', असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 'जर मला अडवलं तर लाखो- कोटींनी मराठे मुंबईत येतील.', असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १९ वा दिवस आहे. त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यांच्यावर सध्या पाटोदा येथे उपचार सुरू आहे. असे असताना देखील मनोज जरांगे हे उद्या मुंबईकडे निघणार आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, 'मी मुंबईला काहीही करून जाणार आहे. उद्या दुपारी १ वाजल्यानंतर मुंबईकडे निघणार आहे. मला सलाईन लावली त्यामुळे मी थांबलो होतो. महंतांनी सांगितली म्हणून मी सलाईन लावली. मला उठता आणि बसता येत नाही आहे. पोटात आणि पायात प्रचंड आग होत आहे. मला आज जाता आले नाही पण मी उद्या १०० टक्के मुंबईला जाणार म्हणजे जाणार.'
सरकारने मनोज जरांगेंना एक ड्राफ्ट पाठवला आहे. त्याबद्दल सांगताना ते म्हणाले की, 'सरकारविरोधात माझ्या डोक्यात चीड आहे. कारण सरकार फसवत आहे. मी मराठ्यांनी मुंबईत कधी यायचे ही तारीख आज सांगणार होतो. पण सरकारने काही तरी ड्राफ्ट पाठवला आहे त्यामुळे मी ही तारीख नंतर सांगणार आहे. मला एका तासाने सरकारने पाठवलेला ड्राफ्ट मिळणार आहे. तो ड्राफ्ट वाचल्यानंतर मी पुढील निर्णय घेणार आहे. मेलो तर हटणार नाही उद्या दुपारी मुंबईकडे निघणार आहे. आपल्यासाठी आरक्षण महत्वाचे आहे. पश्चिम महाराष्ट्र जास्तच खवळला आहे कारण पश्चिम महाराष्ट्राचा वारंवार अपमान केला जातो.'
मनोज जरांगे यांनी समर्थकांना आवाहन करताना सांगितले की, 'कुठेही गाड्या उभ्या करू नका, कुठेच गर्दी करू नका, तुमच्यासाठी मी मुंबईत लढायला जात आहे. १७ ला निघतो तर १८ ला मुंबईत पोहचेल. मला आझाद मैदानात कोण जाऊ देत नाही ते मी बघतो. मला आझाद मैदानात जाऊन दिलं नाही तर मग मी मराठ्यांना बोलावतो. ऐवढा मोठा मराठा समाज आणि सरकार यांच्यामध्ये धुसफूस चालली आहे. वेळ प्रसंगी लाठीचार्ज झाला आणि काही घडलं तर सरकार पडू शकते. जर मला अडवलं तर लाखो-कोटींनी मराठे मुंबईत येतील.
मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना सांगितले की, 'मुख्यमंत्र्यांना नुसतं बोलता येते. मग प्रश्न कधी सोडवायचे. माणसं मेल्यावर तुम्ही आरक्षण देणार का? महाराष्ट्र उद्ध्वस्त झाल्यावर तुम्ही आरक्षण देणार का? महंताच्या शब्दावर सलाईन आणि पाणी घेतलं. मी आधी सलाईन लावायला नाहीच बोलत होतो. पण त्यांनी सांगितले म्हणून मी सलाईन लावली. उद्या रस्त्यावर कुणीच थांबू नका. हार नको, फुलं नको. मी सांगत आहे सर्वांना की मला लवकर मुंबईत जायचे आहे. मला आझाद मैदानात अडवलं तर मी महाराष्ट्राला बोलावतो. उद्या मुक्काम कुठेच नाही थेट मुंबईला जाणार आहे. माझा प्रवासाचा वेळ इथे गेला. मला १८ ला १० वाजेपर्यंत मुंबईत पोहचायचे आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.