Maharashtra weather forecast after October 17 : राज्यातून मान्सूनने माघार घेतली असून बहुतांश भागांत आता हवामान कोरडे झाले आहे. मान्सून परतला असला तरी राज्यातून उष्णता आणि उकाड्याची पाठ अजूनही सुटलेली नाही.
पुढील दोन दिवस राज्यात उष्णता कायम राहणार असून, त्यानंतर १७ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस सर्वदूर किंवा मुसळधार नसला, तरी दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
मुंबईसह किनारपट्टीवर उन्हाचा चटका आणि दमट हवामान
सध्या राज्याच्या तापमानात वाढ झाली आहे. मुंबई, रत्नागिरी आणि अलिबाग या किनारपट्टी भागांत तापमान व दमट हवामानामुळे उकाडा चांगलाच वाढला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत उन्हाचा चटका वाढून दमट हवामानाची शक्यता आहे. याशिवाय कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तसेच पुणे, सातारा, सांगली आणि धाराशिव जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.
यंदा राज्यात १८ टक्के पाऊस कमी
या वर्षीच्या मान्सून हंगामात राज्यात सरासरीच्या तुलनेत १८ टक्के पाऊस कमी नोंदवला गेला आहे. मान्सूनचे चक्र आणि हवामानातील बदल यावर भाष्य करताना, आयएमडी पुणेचे हवामान प्रमुख डॉ. एस. डी. सानप यांनी स्पष्ट केले आहे की, निसर्गचक्र आपले काम करत राहील, त्यात मोठा बदल होणार नाही.
थंडीबाबत काय म्हणाले डॉ. सानप?
जेव्हा 'एल निनो' (El Nino) चा प्रभाव असतो, त्या कालावधीत थंडीचे प्रमाण काहीसे कमी राहते. मात्र, याचा अर्थ राज्यातून थंडी पूर्णपणे गायब होईल असे नाही. थंडी नक्कीच पडेल, परंतु तिचे प्रमाण एरवीपेक्षा थोडे कमी राहण्याची शक्यता आहे, असे डॉ. सानप यांनी म्हटले आहे. पुढील चार-पाच दिवस राज्याच्या विविध भागांत विजांसह वादळी पावसाला पोषक हवामान तयार होत आहे.
उष्ण व दमट हवामानाची शक्यता (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : कोल्हापूर, सोलापूर.
विजांसह पावसाची शक्यता : पुणे, सातारा, सांगली, धाराशिव.
उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे (तापमान अंश सेल्सिअसमध्ये) : रत्नागिरी ३९.४, यवतमाळ ३८.२, सांताक्रूझ ३८, जळगाव ३७.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.