चंद्रपूर/गडचिराेली : चंद्रपूर (chandrapur) आणि गडचिराेली (gadchiroli) जिल्ह्यात दमदार पाऊस (Rain) पडत आहे. या पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या भागातील लाेकप्रतिनिधी बाधित भागांना भेट देत नागरिकांना मदतीचे आश्वासन देत आहे. दरम्यान पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा महामार्ग बंद झाला आहे. परिणामी महाराष्ट्राला तेलंगणाशी जोडणारा हा प्रमुख मार्ग बंद झाल्याने येथील वाहतुक खाेळंबणार आहे. (Chandrapur Rain News)
तेलंगणा मार्ग बंद
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा महामार्ग बंद झालाय. वर्धा नदीच्या उंच पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले आहे. वाहतूक ठप्प झाल्याने पुलाच्या दोन्ही टोकावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्राला तेलंगणाशी जोडणारा हा प्रमुख मार्ग बंद झालाय. अप्पर वर्धा आणि इरई धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पावसाने उसंत घेतली असली तरी धरणातून सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे नदीनाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
पूरग्रस्त भागाला खासदार धानोरकर यांची भेट
चंद्रपूर शहरातील रहमतनगर भागात इरई नदीचे पाणी शिरल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी पूरग्रस्त भागात भेट देऊन प्रशासनाला तातडीने मदतीच्या सूचना केल्या. इरई धरणाचे सर्व सातही दार उघडण्यात आल्याने काठावरच्या भागात पाणी शिरले आहे. चंद्रपूर शहराचा रहमत नगर हा भाग सखल आणि नदीलगत असल्याने इथे सुमारे 50 वर घरात पुराचे पाणी शिरले आहे. या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 60 नागरिकांना हलवण्यात आले असून, प्रशासन इथे कार्यरत आहेत. खासदार धानोरकर यांनी पूरग्रस्त लोकांशी संवाद साधून त्यांना सर्व ती मदत करण्याची ग्वाही दिली. (Maharashtra Telangana Border)
पुरात अडकलेल्या बसमधील प्रवाशांची सुटका
चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर पोलीस ठाण्यातील पथकाने पुरात अडकलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवीत धाडसाची कामगिरी केली. चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील 35 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातून निघालेली ही ट्रॅव्हल्स बस शॉर्टकट म्हणून राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे हैद्राबादला जात होती. पोलीस पथकाने पुढे मार्ग बंद आहे हे सांगितल्यावरही बस चालकाने बस पुढे दामटली. पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास पुराच्या पाण्यात बस बंद पडून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
स्थानिकांची मदत ठरली माेलाची
याची माहिती मिळताच विरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात अंधारातच बचाव अभियान सुरू केले. स्थानिकांच्या मदतीने प्रचंड प्रवाहात देखील दोऱ्या बांधून वृद्ध- लहान मुले व महिला यांना बाहेर काढले. या सर्वांना दुसऱ्या एका बसमध्ये बसवून देत हैद्राबाद रवाना केले. बस पुराच्या पाण्यात अजूनही अडकून पडली आहे. चंद्रपूर पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
रहमत नगर भागात पाणी शिरले
चंद्रपूर शहरातल्या रहमतनगर या सखल भागात इरई नदीचे जवळपास 60 ते 70 घरात नदीचे पाणी शिरले. जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच असून गोसेखुर्द धरणाचा विसर्ग वाढल्यास जिल्ह्यात ब्रम्हपुरी भागात देखील पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. (Flood In Chandrapur)
गडचिरोलीत पावसाची रिपरिप सुरूच
गडचिरोली जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. प्राणहिता नदीची पाणीपातळी घटल्याने आलापल्ली- नागेपल्ली येथील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. या महसुली मंडळात दाेन दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने दोन्ही गावात प्राणहिता नदीच्या पुराचे पाणी शिरले होते. आलापल्ली-भामरागड मार्ग पर्लकोटा नदी फुगल्याने बंद झाला आहे. यामुळे तालुक्यातील 130 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला आहे.
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील सिरोंचा तालुक्यातील मेडीगट्टा येथील महाबंधा-याची सर्व 85 दारे खुली करण्यात आली आहेत. यामुळे सिरोंचा तालुक्यातील बॅक वॉटरमुळे खेडी रिकामी करण्याचे संकट टळण्याची शक्यता आहे. प्रशासनाची नजर गोसेखुर्दच्या पाण्यावर देखील आहे.
जिल्ह्याला वळसा घालणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने परिस्थिती आणखी बिकट होत असल्याने तासातासाला याबाबत माहिती घेतली जात आहे. भामरागड गावात सखल भागात पर्लकोटा नदीचे पाणी शिरल्याने बाजारपेठेचा भाग पाण्याखाली आला आहे.(Chandrapur Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.