Raj Thackeray Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Raj-Uddhav Thackeray : राज ठाकरे - उद्धव ठाकरे इतक्यात एकत्र येतील का? काय आहेत आव्हानं? EXPLAINED

Raj Thackeray Uddhav Thackeray : मराठीच्या मुद्यावरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू २० वर्षांनी एकत्र आले. पण राजकीय पातळीवर त्यांच्यात युती झालेली नाही. त्यांच्या एकत्र येण्यापुढे काय आव्हाने आहेत?

Namdeo Kumbhar

Maharashtra Political News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसा राजकीय वर्तुळातही हालचालींना वेग येतोय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात नव्या समीकरणाची नांदी सुरू झाली आहे. मराठीच्या मुद्द्यावर दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र आले अन् शिवसेना-मनसेच्या युतीची जोरदार चर्चा सुरू झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका झटक्यात एकत्र आले नाहीत, त्यामागची पार्श्वभूमी मोठी आहे. पण मराठीसाठी एकाच स्टेजवर एकत्र आलेले भाऊ राजकीयदृष्ट्या एकत्र येणार का? शिवसेना अन् मनसे इतक्यात एकत्र येऊ शकतात का? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याने शिवसेना (ठाकरे गट) अन् मनसेला उभारी मिळेल, असे म्हटले जातेय, पण इतक्यात दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात का? काय आहेत, समीकरणं? महाराष्ट्राच्या मनात आहे ते होणार का? असा प्रश्न दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेलाही पडलाय.

महेश मांजरेकरांच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नाला राज ठाकरेंनी पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला. त्याच दिवशी उद्धव ठाकरेंकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला, अन् युतीच्या चर्चेने जोर धरला. मनसे अन् शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू असतानाच फडणवीस सरकारकडून हिंदी सक्ती (त्रिसुत्री) धोरण जाहीर झालं. महाराष्ट्र अन् मराठीचा मुद्दा घेत ठाकरेंकडून आंदोलन पुकरण्यात आलं. त्याला राज्यातील इतर नेत्यांकडून प्रतिसाद मिळाला. आंदोलनात कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचा अजेंडा असा म्हणत राज ठाकरेंनी महाराष्ट्राला आवाहन केले होते. उद्धव ठाकरेंकडूनही त्याच दिवशी आंदोलन करण्याचं ठरलं. ५ जुलै रोजी मुंबईमध्ये मोठं आंदोलन होणार असं वाटत असतानाच फडणवीस सरकारने एक पाऊल मागे घेतलं. आता ठाकरेंना आंदोलन करावं लागणार नाही, त्यात ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत, असाच कयास बांधला गेला. पण त्याच दिवशी मराठी विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले अन् ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले. दोन दशकांपासून विभक्त असणारे ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले. मग काय पुन्हा युतीच्या चर्चेने जोर धरला. मीरा रोड येथे झालेल्या मोर्चातही शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून आंदोलन केले. पण प्रश्न आता सुरू झाला... मराठीसाठी एकत्र आलेले ठाकरे बंधू राजकारणात सोबत येणार का?

पुढील काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. मुंबई महापालिका अन् इतर महानगरपालिकांसाठी राज - उद्धव एकत्र येणार का? याबाबत प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रश्नही विचारले. उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली. आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोत. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, अशी वक्तव्ये उद्धव ठाकरेंकडून करण्यात आली. दुसरीकडे राज ठाकरेंनी थोडी सावध भूमिका घेत स्पष्ट वक्तव्य केलेच नाही. नाशिकमधील मनसेच्या मेळाव्यातही राज ठाकरेंनी हातचं राखूनच वक्तव्य केले. योग्य वेळ आल्यावर युतीसंदर्भात बोलेन असं म्हणत राज ठाकरेंनी त्याबाबत स्पष्टपणे काही सांगितलं नाही. मराठी अस्मिता, महाराष्ट्र अन् मुंबईसाठी दोन्ही ठाकरे सकारात्मक आहेत. काही दिवसांपासून राज ठाकरेंचा राजकीय सूरही बदललेला दिसत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडणुकीत दोन्ही ठाकरे एकत्र येऊ शकतात.

ठाकरे बंधू आल्यास मविआचं काय?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. १८ वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर दिसले. पण राजकीयदृष्ट्या भाऊ एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली अन् महाविकास आघाडीच्या (MVA) भवितव्याबाबत प्रश्न निर्माण झाले.

राज आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास मुंबई, नाशिक आणि ठाण्यासारख्या भागांत मराठी मतांचे एकीकरण होऊ शकते. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यासमोरील आव्हाने वाढू शकतात. राज ठाकरेंची हिंदी आणि मुस्लिमविरोधी भूमिका काँग्रेसच्या मतदारांमध्ये नाराजी निर्माण करू शकते. त्यामुळे मनसे मविआमध्ये आल्यास सर्वाधिक विरोध हा काँग्रेसचा असेल, असे बोलले जाऊ लागले आहे. ५ जुलै रोजी झालेल्या मराठी विजयी मेळाव्यालाही काँग्रेसची अनुपस्थिती प्रकर्षानं दिसून आली. अर्थात त्यानंतर नेत्यांकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं. त्यामागचं कारणही सांगितलं. काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केलेय. उद्धव ठाकरे यांनी २० जुलैच्या संजय राऊत यांच्या मुलाखतीत MVA सोबत युतीवर ठोस उत्तर देणं टाळले, त्यामुळे साशंकता निर्माण झाली. दुसरीकडे राज ठाकरे MVA मध्ये सामील होण्यास तयार नसतील, तर उद्धव ठाकरेंना MVA मधून बाहेर पडावे लागू शकते.

राजकीय युती होईल का ? महापालिका निवडणुका एकत्रित लढतील का? आता इतक्यात काही सांगता येत नाही. एकत्र येण्यासंदर्भातील प्रक्रिया खूप मोठी असते. एवढ्यात ही चर्चा पुढे जाणार नाही. सध्या तरी एक पाऊल पुढे पडलंय. ते एकत्र आले तर राजकीयदृष्ट्या चांगला परिणाम होईल.
विजय चोरमारे, ज्येष्ठ पत्रकार

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याआधी अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यातील प्रमुख कारण म्हणजे, राज ठाकरे मविआमध्ये जाणार की उद्धव ठाकरे मविआ सोडणार?.. या प्रश्नांच्या उत्तरानंतरच दोन्ही नेते एकत्र कधी येणार, याचं उत्तर मिळू शकते. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची सुरूवात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर सुरू झाली असली, तरी जागावाटप, स्थानिक नेत्यांमधील समन्वय आणि कार्यकर्त्यांमधील कटुता ही प्रमुख आव्हाने समोर असतील. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेमुळे सत्ताधारी महायुती (भाजप, शिवसेना-शिंदे गट, आणि अजित पवार गट) सतर्क होऊ शकते. एकत्र येण्याची आताच घोषणा झाली तर ठाकरे बंधूंच्या युतीला कमकुवत करण्यासाठी फोडाफोडीचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय येनकेन प्रकारे तपास यंत्रणाचा ससेमिरा मागे लागू शकतो, अशी राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा आहे. मराठी आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू राजकारणाच्या मैदानातही एकत्र येतील का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Blast: 11 आरोपी निर्दोष,मग बॉम्बस्फोट कुणी केले?

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhad Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

SCROLL FOR NEXT