संजय दिना पाटील यांच्या बॉम्ब धमकीच्या वक्तव्यामुळे वाद पेटला
संजय राऊत यांनी UAPA अंतर्गत कारवाईची मागणी केली
ATS चौकशीची देखील मागणी करण्यात आली
खासदार संजय दिना पाटलांनी आंदोलकांवर बॉम्ब टाकण्याची धमकी दिली. या धमकीनंतर खासदार राऊतांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. संजय दिना पाटलांनी नेमकं काय विधान केलं? राऊत कसे आक्रमक झाले? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
ऐकलतं...हे वक्तव्य आहे एका लोकप्रतिनिधीचं. हे खासदार संसदेत ईशान्य मुंबईचं प्रतिनिधीत्व करतात. आणि ही त्यांची भाषा. खासदारांच्या बंडानंतर ठाकरेसेनेनं ऑपरेशन तुडवाची घोषणा केली होती. त्यालाच प्रत्युत्तर देताना खासदार संजय दिना पाटलांनी आंदोलक घराजवळ आले तर बॉम्ब टाकू अशी धमकी दिली. त्यामुळे खासदार संजय दिना पाटलांच्या बॉम्ब टाकण्याच्या वक्तव्यावरून शिंदेंचा बॉम्बचा कारखाना आहे का? असा सवाल उपस्थित करत राऊतांनी शिंदेसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. तर कुणाचंही घर आम्ही उडवू देणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सारवासारव केलीय.
मात्र संजय राऊतांनी हे विधान गांभीर्यानं घेऊन मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहलंय. आणि खासदार संजय दिना पाटील यांच्यावर UAPA अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे. राऊतांच्या पत्रात काय आहे ते पाहूयात...
खासदार संजय पाटील यांनी स्वतः 5 लोकांना ठार केल्याची कबुली दिल्यामुळे त्यांच्यावर तातडीनं हत्येचा गुन्हा दाखल व्हावा. लोकप्रतिनिधीकडून बॉम्ब टाकण्याची धमकी दिली जाणं हा राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. हे बॉम्ब त्यांनी घरात बनवले आहेत का, की त्यांना ते एखाद्या दहशतवादी टोळीकडून मिळाले आहेत, याचा तपास करण्यासाठी त्यांच्या घराची एटीएसमार्फत त्वरित झडती घ्यावी, दहशतवादी आणि राष्ट्रविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असल्याबद्दल त्यांना तात्काळ UAPA कायद्याखाली अटक व्हावी.
दुसरीकडे एवढा मोठा वाद निर्माण होऊनही खासदार संजय दिना पाटील यांची मुजोरीची भाषा काही कमी झालेली दिसत नाही. त्यांनी उलट राऊतांना सुरक्षा सोडून समोर येण्याचं आव्हान दिलं. तर आमदार आदित्य ठाकरेंनी या वादात उडी घेत भाजप आणि शिंदेसेनेवर हल्लाबोल केलाय...
एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा मारणारे सत्ताधारी आणि दुसरीकडे थेट 'बॉम्ब' आणि '5 हत्येची कबुली' देणारे लोकप्रतिनिधी. यामुळे महाराष्ट्रात नेमकं काय सुरु आहे, असा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र एका खासदाराने जाहीरपणे बॉम्ब टाकण्याची भाषा करणं आणि 5 जणांना मारल्याचे सांगणं म्हणजे पोलिस प्रशासन आणि न्यायव्यवस्थेचे धिंडवडे काढण्याचा प्रकार आहे. आता राऊतांच्या पत्रानंतर मुंबई पोलीस आणि एटीएस (ATS) संजय दिना पाटलांच्या चौकशी करणार का? संजय दिना पाटलांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल होणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलयं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.