काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत भाजपचे नेते वसंत देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे अहमदनगरमध्ये तणावाचे वातावरण आहे. या वक्तव्यानंतर काँग्रेसने जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन केले. जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. या घटनेवरून सध्या थोरात आणि विखे-पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच जयश्री थोरात यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर जयश्री थोरात पुन्हा आक्रमक झाल्या असून त्यांनी पुन्हा संगमनेर पोलिस ठाण्यावर शेकडो महिला कार्यकर्त्यांसह धाव घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्यावर आणि समर्थकांवर दाखल झालेले गुन्हे तातडीने मागे घ्या आणि वसंत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई करा, असे निवेदन दिले. 'मला अटक करा. पण बाकीच्यांना त्रास देऊ नका.', अशी मागणी केली.
जयश्री थोरात यांनी यावेळी सांगितले की, 'माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवरचे वक्तव्य केले गेले. मला न्याय देण्याऐवजी माझ्यावरच गुन्हा दाखल केला. मी फक्त संगमनेर तालुक्याची नाही तर महाराष्ट्राची कन्या आहे. प्रत्येक महिलेचा आणि मातेचा अपमान करणारे वक्तव्य आहे. मला न्याय द्या. विषय डायव्हर्ट करू नका. माझ्याबद्दल वक्तव्य होत असताना सुजय विखे यांनी देशमुख यांना थांबवायला पाहिजे होते. उलट सुजय विखे म्हणाले देशमुखसाहेब तुम्हाला वेळ कमी पडला. पुढच्या वेळी वेळ वाढवून देऊ. सुजय विखेंना विषय भलतीकडे घेऊन जायचा आहे. ते मला ताई म्हणताय तर फोन करून मला धीर द्यायला हवा होता. मोठा भाऊ म्हणून तुमच्या बरोबर आहोत असे म्हणायला पाहिजे होते.'
तसंच, 'ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आमच्या ४०० लोकांवर त्यांनी गुन्हे दाखल केलेत. मतदारसंघाबाहेर असणाऱ्या लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केलेत. सर्व काही गलिच्छ पातळीवर सुरू आहे. प्रशासनावर दबाव हे सगळा महाराष्ट्र बघतोय. अटक करायची तर मला करा.बाकीच्यांना त्रास देऊ नका. महिलेचा अवमान झाला. विखे पाटलांना या गोष्टीचे गांभीर्य आहे की नाही? माझ्या मातृत्वावर बोलले गेले. संगमनेर तालुका सुजय विखे यांची खराब भाषणं दोन आठवड्यांपासून सहन करतोय. संगमनेर तालुका संयमी. संयमाचा बांध तोडला गेला आणि त्यामुळे उद्रेक झाला. या प्रकरणानंतर माझी वडिलांसोबत चर्चा झाली. त्यांनी मला खंबीर राहायला सांगितले. मी डगमगणार नाही. ते मला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना वाटतंय या मुलीला खचून टाकू. म्हणजे ही पुढे राजकारणात येणार नाही. पण मी खचणार नाही. मी लढणार.', असं जयश्री थोरात यांनी स्पष्टपणे सांगितले.
बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, 'महाराष्ट्राने देशमुखांचं वक्तव्य ऐकलं आहे. त्याच्यावर कारवाई न करता जयश्री यांच्यावर गुन्हा दाखल झाला. हे पराकोटीचं दुर्दैवी कृत्य सरकार करत आहे. महाराष्ट्रातील जनता या कृत्याचा निषेध करतील. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे बहिणीचे हे हाल करायचे. मतांकरता काही करतात. विखेंना टार्गेट करायचं काहीच कारण नाही. वक्तव्य करताना विखे टाळ्या वाजवत होते. त्यांच्या पक्षातल्यांना हे आवडलं नाही. महाराष्ट्रातील ५ वर्षांत राजकरणाची पातळी बदलली होती. मात्र कालच्या घटनेने याचा तळ गाठलेला आहे. माझी मुलगी आहे म्हणून वाईट वाटत नाही. तर समस्थ महिला वर्गाला ही शिवी दिलेली आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे कायदेशीर तक्रार करू.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.