44 IAS Officer Transfer : महाराष्ट्र सरकारनं राज्यातील प्रशासकीय सेवेत असलेल्या 44 अधिकाऱ्यांच्या (ias officers) बदल्या केल्या आहेत. यामध्ये तुकाराम मुंढे, रामास्वामी. एन, राजेश पाटील, प्रवीण दराडे, मनिषा पाटणकर - म्हैसकर यांच्यासह वर्षा मीना, मिलींद म्हैसकर आदींचा समावेश आहे. एकाच वेळी 44 आयएएस अधिकारी यांच्या शिंदे - फडणवीस सरकारनं बदल्या केल्याने प्रशासकीय सेवेत माेठा फेरबदल झाला आहे. (Maharashtra News)
पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांची मंत्रालयात प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्याकडे मराठी भाषा विभागाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे. ठाणे महापालिका आयुक्त म्हणून अभिजीत बांगर यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून राजेश नार्वेकर, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली करण्यात आली आहे. दिवेगावकरांना बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण विकास विभाग देण्यात आले आहे. नेहमी आपल्या कामामुळे चर्चेत असलेले तुकाराम मुंढे यांची राष्ट्रीय हेल्थ मिशनच्या आयुक्त तथा संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रवीण दराडे यांची नियुक्ती पर्यावरण विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. ते आधी राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आधी चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी प्रकल्प अधिकारी होते.
नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड यांची ठाण्याच्या आदिवासी अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर आशिमा मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
असंघटित कामगार विकास आयुक्त अश्विनी जोशी यांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग सचिव म्हणून करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आदिवासी विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांची नियुक्ती अल्पसंख्याक विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी ए. आर. काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या महासंचालक पदावर पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे असणार आहे. तर उद्योग विकास आयुक्त हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती उद्योग ऊर्जा आणि कामगार विभाग प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.