शिर्डीच्या साईबाबांचा १०४ वा पुण्यतीथी उत्सवा निमित्त साई संस्थानने चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे शिर्डी शहरात संभाव्य गर्दी लक्षात घेता उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच ५ ऑक्टोबरला समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहाणार आहे.
साईबाबांनी १०३ वर्षांपुर्वी ( १९१८ साली ) दस-याच्या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. त्या दिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यानंतर आजतागायत हा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
ज्यामुळे विजयादशमी म्हणजे साईबाबांची पुण्यतिथी अशी एक नवी ओळख या सणाची निर्माण झाली आहे. देशभरातील व जगातील लाखो साईभक्त दरवर्षी हा उत्सव साजरा करण्यासाठी शिर्डीत दाखल होतात. यावर्षी ४ ते ७ ऑक्टोबर २०२२ या काळात १०४ वा श्री पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येत असून उत्सवानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
उत्सवाच्या प्रथम दिवशी मंगळवार दिनांक ०४ ऑक्टोबर रोजी पहाटे ०५.१५ वाजता साईबाबांच्या काकड आरतीने उत्सवाची सुरुवात होईल. पहाटे ०५.४५ वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणुक, पहाटे ०६.०० वाजता व्दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, पहाटे ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती, दुपारी ०४.०० ते ०६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिरातील स्टेजवर होणार आहे. सायंकाळी ०६.१५ वाजता धुपारती होईल. रात्री ७.३० ते ०९.५० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्री ९.१५ वाजता गावातून पालखीची मिरवणूक होणार आहे. रात्री १०.०० वाजता श्रींची शेजारती होणार आहे. उत्सवाचा हा पहिला दिवस असल्यामुळे अखंड पारायणासाठी व्दारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहील.
बुधवार, दिनांक ०५ ऑक्टोबर हा पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी ०९.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम तसेच सकाळी १०.३० वाजता श्रींचे समाधी समोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती तर सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्लंघन कार्यक्रम, सायंकाळी ०६.१५ वाजता धुपारती होईल. रात्री ७.३० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम, रात्री ९.१५ वाजता गावातून श्रींच्या रथाची मिरवणूक, रात्री १०.०० ते पहाटे ०५.०० यावेळेत श्रींच्या समोर कलाकार हजेरी कार्यक्रम होईल. तर उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्यामुळे ०५ ऑक्टोबर रोजी रात्री १०.०० वाजता होणारी शेजारती व दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी पहाटेची ०५.१५ वाजता होणारी काकड आरती होणार नाही.
उत्सवाच्या तृतिय दिवशी गुरुवार ०६ ऑक्टोबर रोजी पहाटे ०५.०५ वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा होईल. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती, दुपारी ०४.०० ते ०६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिरातील स्टेजवर होणार आहे. सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते ०९.१५ यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होईल. रात्रौ ९.१५ वाजता श्रींची पालखीची ( गुरुवार नित्याची पालखी ) मिरवणूक होऊन रात्री १०.०० वाजता श्रींची शेजारती होणार आहे.
उत्सवाच्या सांगता दिवशी शुक्रवार, दिनांक ०७ ऑक्टोबर रोजी पहाटे ०५.१५ वाजता काकड आरती, सकाळी ०५.४५ वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपूजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी १०.०० वाजता गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजेच्या दरम्यान श्रींची माध्यान्ह आरती, सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती, रात्री ७.३० ते ०९.५० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम, रात्री १०.०० वाजता श्रींची शेजारती होणार असल्याचे श्रीमती बानायत यांनी सांगितले.
हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्नशिल आहेत.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.