Kudal Malvan Politics  Saam tv
महाराष्ट्र

Kudal Malvan Politics : निलेश राणे पुन्हा गड मिळवणार की वैभव नाईक हॅट्रिक करणार? काय आहे कुडाळ-मालवणमधील राजकीय समीकरण?

kudal malvan assembly constituency : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात यंदा साऱ्यांचं लक्ष असणार आहे. या विधानसभा मतदारसंघात वैभव नाईक आणि निलेश राणे यांची लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Saam Tv

विनायक वंजारे, साम टीव्ही प्रतिनिधी

Kudal malvan assembly constituency : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कुडाळ मतदारसंघ राज्यातला लक्षवेधी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात 2014 मध्ये नारायण राणेंचा पराभव करून वैभव नाईक या मतदारसंघात जायंट किलर ठरले. नारायण राणे यांचा पराभव केल्यानंतर दहा वर्ष या मतदारसंघात वैभव नाईक या मतदारसंघाच प्रतिनिधित करता आहेत. आता राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्या समोर तगड आव्हान निर्माण केल आहे. त्यामुळे वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे असा या मतदारसंघात सामना होणार आहे.

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचा विचार करता हा पूर्वीचा मालवण-कणकवली मतदारसंघ असा होता. मालवण कणकवली विधानसभा मतदारसंघ असताना 1990 पासून या मतदारसंघावर नारायण राणेंचं वर्चस्व राहील आहे.

कुडाळ-मालवण मतदारसंघात 2014 व 2019 च्या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते-

2014- वैभव नाईक- 70581

नारायण राणे- 60206

वैभव नाईक यांचा 10 हजार 300 मतांनी विजय.

2019- वैभव नाईक- 69168

- रनजीत देसाई- 54819

वैभव नाईक यांचा 15 हजार मतांनी विजय

राणे विरुद्ध नाईक

1980-90 च्या दशकात श्रीधर नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काँग्रेसचे नेते होते. त्याच काळात जिल्ह्यातील शिवसेना विस्ताराची जबाबदारी बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणेंवर दिली होती. 22 जून 1990 रोजी श्रीधर नाईक यांची हत्या झाली. कोकणातील ती पहिलीच राजकीय हत्या होती. ही हत्या नारायण राणे यांनीच केली असल्याचा आरोप त्यावेळी नाईक कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणात त्यांच्यावर आरोपी म्हणून खटलाही दाखल झाला. पण, कोर्टात राणेंची निर्दोष मुक्तता झाली. आमदार वैभव नाईक यांचे श्रीधर नाईक हे काका होते. त्यामुळे राणे आणि नाईक त्यांच्यातील हा संघर्ष जुना आहे.

नारायण राणे यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कॉंग्रेस मध्ये असणारे वैभव नाईक शिवसेनेत दाखल झाले. 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राणेंनी वैभव नाईकचा पराभव केला. त्यानंतर 2014 मधील विधानसभा निवडणुकीत नाईक यांनी या पराभवाची परतफेड केली.

त्याअगोदर 1990 मध्ये कैलासवासी वायडी सावंत यांचा नारायण राणेंनी पराभव केला आणि कोकणात खऱ्या अर्थाने राण्यांची इंट्री झाली त्यानंतर झालेली पोटनिवडणूक असेल किंवा मध्यंतरी झालेल्या सर्व निवडणुका राणेंनी एक हाती अगदी वाढत्या मताधिक्याने जिंकत नेल्या. 2009 मध्ये या मतदारसंघाचे मालवण कुडाळ असे नामकरण झालं आणि या मतदारसंघात सुद्धा पुन्हा एकदा राण्यांचं वर्चस्व निर्माण झालं.

मात्र 2014 मध्ये कॉंग्रेसमध्ये असताना नवख्या वैभव नाईक यांच्याकडून नारायण राणे पराभूत झाले. त्यानंतर वैभव नाईक यांची जायंट किलर म्हणून ओळख निर्माण झाली. 2019 च्या निवडणुकीत भाजपचे अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांचा वैभव नाईक यांनी 13000 मतांनी पराभव केला.मात्र यावेळची निवडणूक ही सर्व अर्थाने वेगळी आहे. कारण या निवडणुकीत राण्यांचे पुत्र निलेश राणे हे रिंगणात आहेत आणि 2014 च्या निवडणुकीत वडिलांच्या झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी निलेश राणे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे म्हणावी तशी सोपी निवडणूक वैभव नाईक यांच्यासाठी नक्कीच नाही.

वैभव नाईक यांनी मोठे प्रकल्प या मतदारसंघात आणले नाहीत, शिवसेनेच्या विरोधामुळे अनेक प्रकल्प कोकणातून हद्दपार झाले. हाच मुद्दा सध्या विरोधकांनी सध्या ऐरणीवर आणला आहे. तर दुसर्‍या बाजूला वैभव नाईक यांनी गेल्या दहा वर्षात सातत्याने मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी वेगवेगळ्या पद्धतीने संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केलाय. संपर्कात असणारा आमदार अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक असा होणार हा सामना खूप महत्त्वाचा असेल. ही लढाई निष्ठावंताची शिवसेना विरूद्ध गद्दारांची शिवसेना अशी असल्याचे सांगत ही लढाई आपणच जिंकणार असल्याचा दावा वैभव नाईक यांनी केला आहे.

निलेश राणे यांनी गेल्या दोन ते तीन वर्षात या मतदारसंघात चांगल्यापैकी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला आहे या मतदारसंघातून कशाही परिस्थितीत विजय मिळवायचाच असा प्रयत्न निलेश राणे यांचा सुरू आहे आणि त्या दृष्टीने गेल्या काही वर्षात त्यांनी अनेक पक्षप्रवेश घडवून आणले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी विकास कामांचा निधी सुद्धा या मतदारसंघात आणण्याचा प्रयत्न केलाय.

दरम्यान, निलेश राणे यांनी नुकतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हातून शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यासाठी त्यांनी कुडाळमध्ये मोठ शक्तीप्रदर्शन केल. आता नारायण राणे यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पूर्ण ताकद निलेश राणे यांच्या पाठीशी असणार आहे त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असेल.

आताचा सामना खूप तगडा असेल कारण वैभव नाईक यांची जनसामान्यात जी प्रतिमा आहे त्याचा फायदा वैभव नाईक यांना होईल मात्र दुसऱ्या बाजूचा विचार करता वैभव नाईक यांच्या समोर उभे असणारे निलेश राणे यांचा गेल्या काही वर्षात या मतदारसंघात असलेला दबदबा आणि त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची असलेली फौज यामुळे वैभव नाईक कशा पद्धतीने लढत देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होणे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणे ही वैभव नाईक यांची जमेची बाजू असली तरी गेल्या काही वर्षात राजकीय समीकरणे बदलली आहेत.

आता शिवसेना विरूद्ध शिवसेना असा या मतदारसंघात सामना होणार आहे. निलेश राणे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ज्याने आपल्या वडिलांचा (नारायण राणे) यांचा पराभव केला, त्याचा या निवडणुकीत पराभव करूनच शांत बसणार असा चंग बांधला आहे. मुख्यमंत्र्यानी सुद्धा 52 हजारच्या लीडने निलेश राणे यांचा विजय होईल असा दावा केला आहे.

कुडाळ-मालवण मतदारसंघात दोन वेळा आमदार असणारे वैभव नाईक तिसऱ्यांदा आमदार होऊन हॅट्रिक करतात की निलेश राणे नारायण राणेंच्या पराभवाचा वचपा काढतात हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Burger E-COLI: एक बर्गर करेल तुमचा घात?बर्गरमधील E-COLI जीवाणूमुळे एकाचा बळी

Assembly Election: मविआत शंभरी कोणाची? जागावाटपावरुन मविआत रस्सीखेच

Maharashtra Election: संजय शिरसाट यांना ठाकरेंच्या राजू शिंदेंचं आव्हान; संभाजीनगर पश्चिमचा गड राखणार?

Congress vs BJP Clash : नगरमध्ये विखे-थोरात वाद टोकाला; अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ, VIDEO

Border Gavaskar Trophy : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; प्रसिद्ध कृष्णाची एन्ट्री, तर स्टार खेळाडू बाहेर

SCROLL FOR NEXT