इंदापूर, ता. ४ ऑगस्ट २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच नाराजी- कुरघोड्याही सुरू झाल्या आहेत. जागा वाटपावरुन महायुतीमधील घटक पक्षांमध्येच कलगीतुरा रंगण्याची शक्यता असतानाच हर्षवर्धन पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे. निवडणूका आल्या की मला टार्गेट केले जाते, एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जातो, असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
इंदापूर विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. लोकसभेला एकत्र आलेले हे कट्टर विरोधक विधानसभेत काय भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशातच हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत महायुतीमधील खदखद मांडली आहे.
"निवडणुका आल्या की काहीजण आणि यंत्रणांकडून जाणीवपूर्वक मला टार्गेट केले जात आहे. एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्ही आघाडीत असो किंवा महायुतीत असो आम्हाला टार्गेट केले जाते. हर्षवर्धन पाटील काही जणांना राजकीय क्षितीजावर नको अशी काहींची भूमिका आहे," अशी खदखद हर्षवर्धन पाटील यांनी बोलून दाखवली. इंदापूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुक अपक्ष लढवण्याची तयारी केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तसे बॅनरही झळकवण्यात आले होते. त्यामुळे विधानसभेत महायुतीत बंडाचा झेंडा पाहायला मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.