नाशिकमध्ये हुंड्यापायी आणखी एका विवाहितेचा बळी गेला आहे. नाशिकच्या येवला तालुक्यात ही घटना घडली आहे. घराजवळच्या विहिरीमध्ये या विवाहितेचा मृतदेह आढळून आला आहे. सोनाली चव्हाण असं या मृत महिलेचे नाव आहे. सोनालीसोबत घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सासरच्यांनीच सोनालीची हत्या केली असल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.
नाशिकच्या येवल्यात सलग दुसरी हुंडाबळीची घटना समोर आली आहे. एक महिन्यापूर्वीच भक्ती गुजराती या विवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. भक्तीच्या आत्महत्याचे प्रकरण ताजे असताना येवल्यातील आडसुरेगाव या ठिकाणी आणखी एक अशीच घटना घडली. सोनाली चव्हाण या विवाहितेचा मृतदेह घराजवळच्या एका विहिरीत आढळून आला. तिच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
दोन दिवसापूर्वी बेपत्ता असलेल्या सोनालीचा मृतदेह घराशेजारील विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. नातेवाईकांनी सोनालीचा नवरा, सासू, सासरे यांच्यावर गंभीर आरोप केले. दरम्यान सोनालीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन येवला उपजिल्हा रुग्णालयामध्ये न करता नाशिक येथे करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अहवाल आल्यानंतर तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली हे स्पष्ट होईल.
रविवारी रात्री उशिरा येवला पोलिसांनी सोनाली चव्हाण प्रकरणात हुंडाबळी प्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांकडून दोन आरोपींना ताब्यात देखील घेण्यात आले. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात सोनाली चव्हाणच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेमुळे येवल्यात खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.