आज २० नोव्हेंबर रोजी सर्वत्र महाराष्ट्र विधानसभा निवडणूका होत आहे. महाराष्ट्रात निवडणूकीला सुरुवात झाली आहे. अशातच सकाळपासून थंडी असतानाही भंडारा जिल्ह्यात आता मतदानाला सुरुवात झालेली आहे. साकोली विधानसभा मतदार संघातील वलमाझरी येथे आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहे. या केंद्रात विविध जैवविविधतेचं दर्शन व वन्य प्राण्याविषयी आपुलकी आणि विविध वन्यप्राण्याचे चित्र साकारण्यात आले आहे.
राज्यप्राणी शेकरू, वाघ, बिबटं, हरिण, नीलगाय, रानगवा, अस्वल, मासा आणि पक्षी जसे सारस, गरुड, गिधाड, घुबड, हरियल यांचे सुंदर चित्रण रेखाटण्यात आलेले आहे. मतदान केंद्रात सुंदर गुफा प्रवेश तयार करण्यात आले आहे. सदर मतदान केंद्र मतदारांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे. जैवविविधतेच्या दर्शनासह वन्यप्राण्यांचे चित्र आकर्षण ठरत आहेत. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या वलमाझरी मतदान केंद्रातून वन्यप्राणी संरक्षणाचा संदेश देण्यात आला आहे.
यादरम्यान, वाशिम जिल्ह्यातील 13 मतदान केंद्रांवर वनविभागाच्या वतीने "एक मत लोकशाहीसाठी, एक झाड पर्यावरणासाठी" या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत मतदान करून बाहेर पडलेल्या मतदारांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
वनविभागाच्या या अभिनव उपक्रमामुळे लोकशाही आणि पर्यावरण यामध्ये सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मतदारांना मतदानाच्या महत्त्वासोबतच पर्यावरण रक्षणाचे भानही देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.