लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मतदान करण्यासाठी नागरिक देखील घराबाहेर पडत आहेत. मात्र, मतदानाला सुरुवात होताच ठिकठिकाणी EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं.
त्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे ६ ठिकाणी तर गंगापूर येथे २ ठिकाणी EVM मध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सध्या प्रशासनाकडून अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दुसरीकडे मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील गणेश मोफत वाचनालय मतदान केंद्रावरील EVM मशीन देखील काही काळ बंद पडलं होतं. पुण्याच्या वडगाव शेरीमध्ये देखील EVM मशीन अचानक बंद पडलं. त्यामुळे अर्धा तासांपासून मतदान बंद होतं. परिणामी मतदानासाठी नागरिक खोळंबले होते.
दरम्यान, निवडणूक कर्मचाऱ्यांकडून सध्या EVM दुरुस्तीचे प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी EVM देखील बदलण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे पहिल्या तीन टप्प्यातील मतदानावेळी देखील राज्यात ठिकठिकाणी EVM मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे मतदारांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यातील ११ मतदारसंघात आज मतदान होत आहे. यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. मात्र, मतदानाच्या दिवशीच महाराष्ट्रावर पावसाचे गडद सावट निर्माण झाले आहे. सोमवारी दुपारनंतर अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.