लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये (Loksabha Election 2024) राज्यात सर्वात मोठी आणि महत्वाची लढत ही पवारांच्या बारामतीमध्येच पाहायला मिळाली. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते अजित पवार यांच्यामध्ये अस्तित्वाची लढाई झाली. या मतदारसंघामध्ये नणंद विरुद्ध भावजय अशी हाय व्होल्टेज लढत झाली. या मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक रंगली होती.
बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. तर त्यांच्याविरोधात अजित पवार गटाकडून त्यांची भावजय सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली. ही निवडणूक शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी खूपच प्रतिष्ठेची होती. या मतदारसंघामध्ये प्रमुख लढत सुळे विरुद्ध पवार अशीच पाहायला मिळाली. ही निवडणूक जिंकणे सुप्रिया सुळे यांच्यासोबत सुनेत्रा पवार यांच्यासाठी खूपच महत्वाचे असल्यामुळे दोन्ही बाजूने चांगलाच जोर लावण्यात आला होता. आपल्या पक्षाच्या उमेदवारांनी विजयी व्हावे यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.
बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे या तीन वेळा खासदार राहिल्या आहेत. आता चौथ्यांना ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी या मतदारसंघातून विजयी व्हावे यासाठी शरद पवार गटाने जोरदार प्रचार केला. आपल्या मुलीच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांची सुरुवात बारामतीतूनच केली.
तर या मतदारसंघामध्ये विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील यांनी बंड थोपटले होते. पण त्यांचे बंड शांत करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले. त्यानंतर हे दोघेही सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले. सुनेत्रा पवार यांच्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली होती. बारामतीत ५३.०८ टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी विजयासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली. पण यामधील कोणाचा विजय होईल हे येत्या ४ तारखेला स्पष्ट होईल.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या २००९ पासून खासदार आहेत. २०१४च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी रासपचे उमेदवार महादेव जानकर यांचा पराभव केला होता. सुप्रिया सुळे यांना ५,२१,५६२ तर महादेव जानकर यांना ४,५१,८४३ इतकी मतं पडली होती. २०२९ च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव केला होता. सुप्रिया सुळे यांना ६८६,७१४ तर कांचन कुल यांना ५,३०,९४० इतकी मतं पडली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.