लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वात जास्त मोठा ड्रामा घडला असेल तर नाशिक मतदारसंघात. जागा वाटप ते निवडणूक प्रचार या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान येथील ड्रामा आणि थ्रील कमी झालं नव्हतं. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील अखेरच्या टप्प्यात नाशिकमध्ये मतदान पार पडलं. उन्हाचा तडाखा वाढला असतानाही मतदार घराच्या बाहेर पडत विक्रम मतदान केलं.
नाशिक लोकसभेत ३१ उमेदवार,तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण १० उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान नाशिक मतदारसंघात हेमंत गोडसे आणि राजाभाऊ वाजे यांच्यात थेट लढत आहे. तर अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज मात्र शिवसेना आणि महाविकास आघाडीचा खेळ खराब करणार करतील. शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने कोणाच्या मतावर डल्ला मारला जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
शांतिगिरी महाराजांनी रणांगणात उतरल्याने तिरंगी लढत निर्माण झालीय. तसा नाशिक मतदार संघाचा इतिहास पाहिला तर हा मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात राहिलाय. मात्र आता दोन्ही शिवसेना दोन गटात विभागली गेलीय, त्यामुळे कोणत्या शिवसेनेच्या उमेदवाराला नाशिककर खासदार म्हणून निवडून देतील ते पाहावं लागले. दोन्ही शिवसेनेसाठी हा नाशिक मतदारसंघ महत्त्वाचा आहे.
नाशिकच्या जागेसाठी महायुतीत सर्वाधिक गोंधळ झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनेही या जागेवर दावा केला होता. त्यामुळे महायुतीसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. एका बाजुला छगन भुजबळ या जागेसाठी आक्रमक होते तर दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी देखील या जागेसाठी आक्रमक होते.नाशिकच्या जागेसाठी निर्माण झालेल्या महापेच सोडवत अखेर हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली.
दरम्यान गेल्या दोन्ही टर्ममध्ये शिवसेनेने विजय मिळवलाय.दोन्ही वेळेस म्हणजे २०१४ आणि २०१९ च्या लोकसभेत हेमंत गोडसे यांनी विजय मिळवलाय. मात्र यावेळी येथील आणि राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झालीय.शिवसेनेत दोन गट पडल्याने येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना दिसतो.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटासोबत गेलेल्या हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाली खरी मात्र त्यासाठी त्यांना मोठी उठाठेव आणि घासाघीस करावी लागलीय. या सर्व राजकारणाच्या खेळनंतर गोडसे पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक्ट साधणार का राजाभाऊ वाजे राज करणार याचे तर्कविर्तक काढले जात आहेत. कारण राजाभाऊ वाजे ठाकरे गटाचे नेते असून त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलीय. याच दरम्यान शनिवारी एक्झिट पोल समोर आलेत.
या पोलच्या अंदाजानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार विशेष राजाभाऊ वाजे हे विजय होणार असल्याचा अंदाज वर्तवला गेलाय. यामागे कारण म्हणजे राजाभाऊ वाजे यांच्यावर कोणताच आरोप नाहीये. तसेच ठाकरे ग्रुपचा तळगळात चांगल्या पद्धतीचा संपर्क आहे. राजाभाऊ वाजे हे माजी आमदार असून सिन्नरमध्ये त्यांचं जास्त जनसंपर्क असल्याने तेथूनच त्यांना लीड मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शहरी मतदारसंघ आणि तर हेमंत गोडसे हे दोन टर्म खासदार राहिल्याने अनेकांना त्यांच्या नावाची माहिती आहे, शिवाय पंतप्रधान मोदींच्या सभा झाल्याने गोडसेंही कमालीची टक्कर देतील असं म्हटलं जात आहे. या निकालात महायुतीमधील समन्वय आणि महाविकास आघाडीचं समन्वय हे देखील मौलाचं ठरणार आहे. महायुतीमध्ये उमेदवारी ठरवण्यापासून ते प्रचारातील गदारोळ यात समन्वयाचा अभाव दिसून आलाय.
या लोकसभा मतदारसंघात महापालिका हद्दीतील साडेतीन तर,ग्रामीण भागातील अडीच विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये नाशिक मध्य,पूर्व व पश्चिम या तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. देवळाली शहरी आणि ग्रामीण तसेच सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. तर इगतपुरी विधानसभेवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदान करणारे मतदार हे ६० टक्के शहरी आहेत.
नाशिक लोकसभा मतदारस संघात २००४, २००९ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजय मिळाला होता, तर २०१४, २०१९ मध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता.
नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण ६१ टक्के मतदान झालं. यात सर्वाधिक मतदान सिन्नरमध्ये झालं. इगतपुरी येथे (६६ टक्के), देवळाली (६१ टक्के), नाशिक पश्चिम (६० टक्के), नाशिक मध्य (५७ टक्के), नाशिक पूर्वमध्ये (५७ टक्के) मतदान झाल्याची नोंद करण्यात आलीय.
नाशिकमध्ये २०१४ आणि २०१९ या लोकसभा निवडणुकीच्या टर्ममध्ये सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले हेमंत गोडसे विजयी झालेत. २०१९ च्या लोकसभेत हेमंत गोडसेंना ५६३५९९ इतकी मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ हे २७१३९५ मतांनी दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. विजयी उमेदवार हेमंत गोडसे हे २९२२०४ च्या मताधिक्याने विजयी ठरले. या ठिकाणी सुद्धा मराठा आरक्षण, नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प , कांदा निर्यात, शहरातील रखडलेला आयटी पार्क हे मुद्दे चर्चेत राहिलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.