मधुमेहींनी नाश्ता सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान करावा.
उशिरा नाश्ता केल्यास रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते.
नाश्त्यानंतर हलकी शारीरिक हालचाल केल्यास ग्लुकोजचे शोषण अधिक चांगले होतं.
डायबेटीज असणाऱ्या व्यक्तींसाठी नाश्त्याची वेळ आणि त्यातील पदार्थ हे दोन्ही तितकेच महत्त्वाचे असतात. संशोधनानुसार सकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान नाश्ता केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणासाठी सर्वोत्तम मानले जाते. यानंतर केलेला नाश्ता विशेषतः सकाळी ९ नंतर केलेला नाश्ता हा शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलतेवर परिणाम करतो आणि जेवणानंतर रक्तातील साखर जास्त वाढते. उलट खूप लवकर, म्हणजे ६ वाजण्यापूर्वी नाश्ता केल्यावर शरीर पूर्णपणे जागं झालेलं नसतं, त्यामुळे त्याचा विशेष फायदा होत नाही.
काही जण वजन कमी करण्यासाठी उपवास करतात (intermittent fasting) किंवा नाश्ता टाळतात. मात्र तज्ज्ञांच्या मते मधुमेहींसाठी ही सवय घातक ठरू शकते. नाश्ता टाळल्याने इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि पुढील जेवणांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढते. याशिवाय सकाळी डॉन फिनॉमेनन नावाचा परिणाम दिसतो. शरीरात सकाळी कोर्टिसोलसारखे हार्मोन्स वाढतात, त्यामुळे रक्तातील साखर नैसर्गिकरित्या वाढते. जर नाश्ता उशिरा घेतला, तर हा परिणाम खूप तीव्र होतो.
डायबेटिजसाठी योग्य नाश्त्यात कार्बोहायड्रेट्स जसे ओट्स, फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रथिनयुक्त पदार्थ अंडी, नट्स, बिया, लो-फॅट डेअरी पदार्थ आणि आरोग्यदायी फॅट्स अवोकाडो, ऑलिव्ह ऑइल, बदाम यांचा समावेश असावा. यामुळे रक्तातील साखरेची वेगाने वाढ होण्याचा धोका कमी होतो. नाश्त्यात साखरयुक्त, पॅकेज्ड किंवा प्रोसेस्ड पदार्थ टाळावेत. कार्बोहायड्रेट्ससोबत प्रथिने आणि फॅट्स एकत्र घेतल्याने ऊर्जा जास्त वेळ टिकते आणि साखरेची वाढ नियंत्रित राहते.
तज्ज्ञ सांगतात की दररोज नाश्ता एकाच वेळी घेण्याची सवय लावल्यास शरीराचं बायोलॉजिकल क्लॉक व्यवस्थित चालतं. नाश्त्यापूर्वी आणि नंतर रक्तातील साखरेचे प्रमाण तपासल्याने कोणते पदार्थ आणि कोणती वेळ आपल्या शरीरासाठी योग्य आहे हे समजते. काही लोकांना सकाळी साखरेत चढ-उतार जाणवतात, अशा वेळी डॉक्टर किंवा डायटिशियनचा सल्ला घेऊन आहाराची वेळ आणि प्रमाण ठरवणे आवश्यक असते.
नाश्त्यानंतर हलकी ते मध्यम स्वरूपाची शारीरिक हालचाल करणं गरजेचं असतं. जसं की चालणे, योगा किंवा थोडा व्यायाम केला तर रक्तातील साखर चांगल्या प्रकारे नियंत्रित राहते. तज्ज्ञांचे मत असे आहे की सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान घेतलेला संतुलित आणि पौष्टिक नाश्ता हा मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी सर्वात योग्य आहे. वेळेचे सातत्य, योग्य आहाराची निवड, नियमित मॉनिटरिंग आणि थोडी शारीरिक हालचाल या सर्व गोष्टी एकत्रितपणे रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवतात आणि दीर्घकाळ आरोग्य चांगलं राहतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.