

आपण किती झोपतो हेच नव्हे तर कशी झोप पूर्ण करतो हेही आपल्या शरीर आणि मनाच्या आरोग्यावर मोठा परिणाम करतं. आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिका PLOS Biology मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नव्या अभ्यासात झोपेचे पाच वेगवेगळे प्रकार ओळखले गेले आहेत. यामध्ये हजारो लोकांच्या झोपेच्या सवयी, झोप मोड, औषधांचा अतिवापर, मेंदूचे MRI स्कॅन आणि स्मरणशक्तीच्या चाचण्या तपासल्या. या अभ्यासातून स्पष्ट झालं की झोप ही फक्त विश्रांतीचा भाग नसून तिचा आपल्या भावनिक, मानसिक आणि सामाजिक वर्तनावर थेट परिणाम करणारा आवश्यक घटक किंवा मुद्दा आहे.
अभ्यासानुसार काही लोक शॉर्ट स्लीपर म्हणजे कमी झोप घेणारे असतात. हे लोक दररोज सहा तासांपेक्षा कमी झोप घेतात. त्यांना वाटतं की ते व्यवस्थित त्यांची कामे पूर्ण करतात. पण त्यांच्या शरीरात मात्र हार्मोन्सचे संतुलन बिघडलेलं असतं. अशा लोकांना चिडचिड, भावनिक अस्थिरता, आणि तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता वाढते. बरेच दिवस कमी झोप घेतल्याने लठ्ठपणा, डायबेटीज, हृदयाच्या समस्या आणि ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका जास्त असतो.
काही लोकांना झोपेत वारंवार जाग येते. अशी झोप मेंदूला पूर्ण विश्रांती देत नाही. झोपेमध्ये मेंदूतील टॉक्सिन्स निघून जातात, पण मध्येच जाग आल्यास हा नैसर्गिक स्वच्छतेचा प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी अडचण येते, स्मरणशक्ती कमी होते आणि राग व चिंता वाढतात. एकूण झोपेचा कालावधी पुरेसा असला तरी झोप तुटक असल्याने मेंदूची कार्यक्षमता कमी होते.
काही लोकांना पुरेशी झोप मिळते, पण ती आरामदायी नसते. अशी झोप घेणाऱ्यांमध्ये डिप्रेशन, चिंता आणि थकवा जास्त दिसतो. त्यांची झोप अनियमित असते आणि मेंदू सतत ताणाखाली राहतो. यामुळे दिवसभर थकवा आणि मानसिक थकवा सुद्धा जाणवतो.