साधारणतः ४०% महिलांना लैंगिक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु, बहुतेक महिला लाजेमुळे ही समस्या सांगत नाही. त्रास वाढू लागल्यानंतर डॉक्टरांकडे उपचारासाठी येतात. या समस्या गर्भधारणा किंवा रजोनिवृत्तीतील हार्मोनल बदल, तसंच डायबिटीज, ताण, लठ्ठपणा किंवा पेल्विक शस्त्रक्रियेमुळे होऊ शकतात.
इतक्या महिला या समस्यांनी त्रस्त असूनही वेळेवर वैद्यकीय मदत घेत नाहीत. त्यामुळे निदान आणि योग्य उपचार उशिरा होतात. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील प्रसूतितज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीला देसाई यांनी सांगितलं की, “लैंगिक समस्या केवळ पुरुषांमध्येच नाहीत तर महिलांमध्येही तितक्याच सामान्य आहेत. ४०% महिलांना लैंगिक समस्या जाणवतात आणि यापैकी अनेक प्रकरणं कधी नोंदवली जात नाहीत. कारण महिला लाजेमुळे डॉक्टरांकडे उपचारासाठी येत नाहीत यात अनेक महिलांमध्ये लैंगिक इच्छा कमी होणं, उत्तेजन मिळण्यात अडचण येणं, वेदनादायक संभोग, योनी कोरडेपणा अशा समस्या जाणवतात.
२५ ते ३७ वयोगटातील १० पैकी ४ महिलांना योनी कोरडेपणासारख्या तक्रारी होतात शरीरातील हार्मोनल बदल, डायबिटीज, थायरॉईड किंवा पेल्विक स्नायूंची कमजोरी तसंच मानसिक – चिंता, नैराश्य किंवा नात्यातील ताण ही यामागील कारणं आहेत. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास पुढे जाऊन ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते. या समस्या महिलांच्या केवळ लैंगिक आरोग्यावरच नाही तर संपूर्ण आयुष्यावरही विपरित परिणाम करतात, असं डॉ, नीला देसाई यांनी म्हटलंय.
डॉ. देसाई पुढे म्हणाल्या, “लैंगिक आरोग्य हे एकूण आरोग्याचा भाग आहे, हे मान्य करून लगेच कृती करणं गरजेचं आहे. बहुतांश प्रकरणं उपचारानंतर ठीक होतात. हार्मोनल थेरपी, औषधे, पेल्विक फ्लोअर व्यायाम, समुपदेशन किंवा जीवनशैलीत बदल जसं की ताण कमी करणं, वजन नियंत्रण, संतुलित आहार घेतल्यास लैंगिक समस्येपासून मुक्ती मिळू शकते.”
पुण्यातील औंध इथल्या अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चाईल्ड मधील प्रसूति आणि स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सिनियर कन्सल्टंट डॉ. मधुलिका सिंह यांनी सांगितलं की, “हार्मोनल बदल, रजोनिवृत्ती, गर्भधारणा, डायबिटीज, ताण किंवा लठ्ठपणा ही या समस्येमागील कारण आहेत. नियमित व्यायाम, संतुलित आहार, ताण नियंत्रण, धूम्रपान-मद्यपान टाळणे आणि समुपदेशनाने मोठा फरक पडतो.महिलांनी कधीही लाज वाटून या समस्या लपवू नयेत. कारण वेळेवर उपचार घेतल्यास आरोग्य आणि आत्मविश्वास दोन्ही परत मिळू शकतात.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.